बॅंकॉक : स्टार खेळाडू सायना नेहवाल आणि माजी नंबर वन किदाम्बी श्रीकांत यांनी बुधवारी थायलंड ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेत सलामीला विजय मिळवून दुसरी फेरी गाठली. कश्यपने मात्र मांसपेशींच्या दुखण्यामुळे सामन्यातून माघार घेतली.सायनाने मलेशियाची प्रतिस्पर्धी सेल्वादुरारे किसोना हिचा २१-१५, २१-१५ ने पराभव केला. श्रीकांतने आपलाच सहकारी सौरभ वर्मा याच्यावर २१-१२, २१-११ अशा गुणफरकाने मात केली.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता कश्यप तिसऱ्या गेममध्ये ८-१४ असा पिछाडीवर होता. त्याचवेळी त्याला मांसपेशींचा त्रास सुरू झाला. कॅनडाच्या ॲन्थोनी हो शू याच्या विरोधातील पहिला गेम कश्यपने ९-२१ ने गमावला. त्यानंतरच्या गेममध्ये त्याने २१-१३ ने बाजी मारुन लढत १-१ अशी बरोबरीत आणली होती. पुरुष दुहेरीत सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने एक गेम गमाविल्यानंतरही मुसंडी मारुन कोरियाची जोडी किम जुंग आणि ली योंग डाए यांच्यावर १९-२,२१-१६ आणि २१-१४ अशी मात करीत सलामीचा सामना जिंकला. अर्जुन एम. रामचंद्रन आणि ध्रुव कपिला या जोडीला मलेशियाचे ओंग यू सिन आणि टियो ई यी यांनी १३-२१,२१-८,२४-२२ ने पराभूत केले. मिश्र दुहेरीत सिक्की रेड्डी सुमीत रेड्डी पहिल्या सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडले आहेत.
श्रीकांतच्या तक्रारीची बीडब्ल्यू एफकडून दखलकिदाम्बी श्रीकांतची वारंवार कोरोना चाचणी घेणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या वागणुकीची दखल विश्व बॅडमिंटन महासंघाने घेतली आहे. मंगळवारी झालेल्या कोरोना चाचणीनंतर श्रीकांतच्या नाकातून रक्त वाहत होते. अधिकाऱ्यांच्या वर्तनावर नाराज असलेल्या श्रीकांतने हे असह्य असल्याचे म्हटले होते. बीडब्ल्यूएफने दखल घेत आयोजकांना रक्त वाहण्याच्या घटनेची माहिती घेण्यास सांगितले. श्रीकांतच्या कोविड चाचणीचा नमुना तीनदा घेण्यात आल्याने तो तणावात होता. खेळाडूंचा सुरक्षित तपास व्हावा, तसेच त्यांना चांगले वातावरण मिळावे, याची दक्षता बाळगण्याचे बीडब्ल्यूएफने आयोजकांना आदेश दिले आहेत.