हैदराबाद : सलग दोन लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यामुळे अडचणीत असलेला गतविजेता सनरायझर्स हैदराबाद संघ आज, सोमवारी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या लढतीत विजयी मार्गावर परतण्यास प्रयत्नशील आहे. सनरायझर्सने पहिल्या दोन लढतीत रॉयल चॅलेंजर्स व गुजरात लायन्स संघांचा गृहमैदानावर पराभव केला होता, पण त्यानंतर त्यांना मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबाद संघाची भिस्त वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, अफगाणिस्तानचा राशिद खान, अनुभवी आशीष नेहरा, बेन कटिंग आणि बांगलादेशचा मुस्तफिजूर रहमान यांच्या गोलंदाजीवर अवलंबून आहे. डेथ ओव्हर्समध्ये भुवनेश्वरने प्रभावी मारा केला आहे, तर युवा राशिदने आपल्या लेगस्पिनने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर व शिखर धवन यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे, पण मधल्या फळीतील फलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची आशा आहे. संघात युवराज व मोझेस या दिग्गज अष्टपैलू खेळाडूंचा समावेश आहे. हैदराबादप्रमाणे पंजाब संघानेही पहिल्या दोन लढतींमध्ये विजय मिळवत चांगली सुरुवात केली होती, पण हा संघही विजयी मार्गावर परतण्यास उत्सुक आहे. पंजाब संघात डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल व इयान मॉर्गन यांच्यासारख्या आक्रमक विदेशी फलंदाजांचा समावेश आहे. पंजाब संघाची गोलंदाजीची भिस्त मोहित शर्मा व ईशांत शर्मा यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.
किंग्जविरुद्ध हैदराबाद विजयासाठी उत्सुक
By admin | Published: April 17, 2017 1:28 AM