न्यूयॉर्क : अव्वल आशियाई टेनिसपटू जपानचा केई निशिकोरी याने यूएस ओपनमध्ये धक्कादायक निकाल लावताना दोन वेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीतील द्वितीय खेळाडू ब्रिटनच्या अँडी मरेला पराभूत केले. या शानदार विजयासह निशिकोरीने यूएस ओपनच्या उपांत्य फेरीत दिमाखात धडक मारली. त्याच वेळी महिलांमध्ये आपल्या २३व्या विक्रमी गँडस्लॅमच्या दिशेने भक्कम पाऊल टाकलेल्या अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने उपांत्य फेरी गाठली.तब्बल ५ सेटपर्यंत रंगलेल्या अत्यंत अटीतटीच्या सामन्यात पहिला सेट एकतर्फी गमावल्यानंतरही निशिकोरीने नियंत्रित खेळ करताना बलाढ्य मरेला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखविला. त्याच वेळी सामनादरम्यान पावसाच्या व्यत्ययामुळे स्टेडियमचे छत बंद करण्यात आल्यानंतर प्रेक्षकांच्या आवाजाचा त्रास झाल्याने खेळावर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी आल्याचे मरेने सांगितले. परंतु, त्याने निशिकोरीला त्याच्या विजयाचे श्रेय देताना ही लढत खूप रोमांचक झाली आणि मी खेळाचा पुरेपूर आनंद घेतला, असेही सांगितले.पहिला सेट मरेने ६-१ असा एकतर्फी जिंकून आक्रमक सुरुवात केली; मात्र यानंतर निशिकोरीने ६-४ असे पुनरागमन केले. तर, तिसरा सेट पुन्हा मरेने जिंकल्यानंतर चौथ्या सेटमध्ये निशिकोरीने बाजी मारून सामना अंतिम व निर्णायक पाचव्या सेटमध्ये नेला. या वेळी निशिकोरीने मोक्याच्या वेळी खेळ उंचावताना अखेरपर्यंत लढवय्या खेळ करून १-६, ६-४, ४-६, ६-१, ७-५ असा शानदार विजय मिळविला. याआधी २०१४मध्ये यूएस ओपनचा उपविजेता ठरलेल्या निशिकोरीने पाचव्या सेटमध्ये ११व्या गेममध्ये मरेची सर्व्हिस ब्रेक केली आणि यानंतर सर्व्ह करताना सामना आपल्या नावावर केला.दुसऱ्या बाजूला महिला गटामध्ये जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि संभाव्य विजेती सेरेना विल्यम्सने आपल्या विक्रमी २३व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाकडे दमदार आगेकूच करताना उपांत्य फेरीत प्रवेश केला. तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात सेरेनाने रोमानियाच्या सिमोना हालेपचे कडवे आव्हान ६-२, ४-६, ६-३ असे परतावले. विशेष म्हणजे, यंदाच्या यूएस ओपनमध्ये सेरेनाविरुद्ध सेट जिंकणारी हालेप पहिली खेळाडू ठरली. मात्र, अंतिम सेटमध्ये सेरेनाच्या ताकदवान खेळापुढे निभाव न लागल्याने हालेपचे आव्हान संपुष्टात आले. (वृत्तसंस्था)उपांत्य सामन्यात निशिकोरीसमोर स्वित्झर्लंडच्या स्टेनिसलास वावरिंकाचे तगडे आव्हान असेल.वावरिंकाने अर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोला ७-६, ४-६, ६-३, ६-२ असे नमवून उपांत्य फेरी गाठली.मनगटाच्या दुखापतीमुळे सलग ९ ग्रँडस्लॅमना मुकलेल्या डेल पोत्रोने यंदाच्या विम्बल्डनमध्ये पुनरागमन करताना दुसऱ्याच फेरीत वावरिंकाला नमवले होते. त्या पराभवाचा वावरिंकाने या वेळी वचपा काढला.रिओ आॅलिम्पिकमध्ये डेल पोत्रोने एकेरीचे रौप्यपदक पटकावले आहे.महिलांच्या उपांत्य फेरीत सेरेना विल्यम्ससमोर झेक प्रजासत्ताच्या १०व्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोवाचे आव्हान असेल. कॅरोलिनाने क्रोएशियाच्या अॅना कोनजुहला सलग दोन सेटमध्ये ६-२, ६-२ असे नमविले.
केईचा खळबळजनक विजय
By admin | Published: September 09, 2016 12:33 AM