ऑनलाइन लोकमत
जोहान्सबर्ग, दि. 19 - भारतीय वंशाचा डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज याला आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेसाठी द. आफ्रिका संघात स्थान मिळाले आहे. १५ सदस्यांच्या संघात त्याचा समावेश करण्यात आल्याची घोषणा क्रिकेट द. आफ्रिकेने केली.
चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात १ जूनपासून होईल. त्याआधी आफ्रिका संघ इंग्लंडविरुद्ध तीन वन डे खेळणार आहे. चॅम्पियन्समध्ये द. आफ्रिकेला सलामीचा सामना लंकेविरुद्ध ३ जून रोजी खेळायचा आहे. २६ वर्षांच्या केशव महाराजचे कसोटी पदार्पण फारच प्रभावी ठरले. त्याच्या संघातील पुनरागमनामुळे फिरकीला बळ मिळणार आहे. इम्रान ताहिरच्या सोबतीने तो गोलंदाजी करणार आहे. वेगवान गोलंदाज मोर्नी मोर्केल देखील दहा महिन्यानंतर वन डे संघात परतला. कासिगो रबाडा, वेन पार्नेल, ख्रिस मॉरिस, ड्वेन प्रिटोरियस आणि आदिले फेहलुकवायो हे अनुभवी गोलंदाज संघात आहेत. संघ १६ मे रोजी इंग्लंडकडे रवाना होईल. स्थानिक संघाविरुद्ध आफ्रिकेला दोन सराव सामने खेळायचे आहेत.