नागपूर : भारताच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात खेळाडूंचा फिटनेस हीच यशाची गुरुकिल्ली ठरणार असल्याचे मत माजी कर्णधार, माजी निवड समिती अध्यक्ष दिलीप वेंगसरकर यांनी आज, रविवारी येथे व्यक्तकेले. फेब्रुवारीत आयोजित वर्ल्डकपआधी भारतीय संघ आॅस्ट्रेलियात चार कसोटी सामन्यांसह वन-डे तिरंगी मालिका खेळणार आहे. ४ डिसेंबरपासून दौऱ्याला प्रारंभ होईल.भारतीय क्रिकेटला दिलेल्या अद्वितीय योगदानाबद्दल ५८ वर्षीय दिलीप बळवंत वेंगसरकर यांना ‘कर्नल सी. के. नायडू जीवन गौरव’ हा मानाचा पुरस्कार देऊन ‘बीसीसीआय’ने नुकतेच गौरविले. लोकमत ग्रुपच्या क्रीडा पत्रकारांसोबत त्यांनी लोकमत मीडिया लिमिटेडचे चेअरमन खा. विजय दर्डा यांच्या निवासस्थानी संवाद साधला.ते म्हणाले, ‘आॅस्ट्रेलिया दौरा लांबलचक असल्याने कसोटी मालिकेत प्रत्येक गोलंदाजाला प्रदीर्घ वेळ गोलंदाजी करावी लागेल. या दौऱ्यात फिटनेस निर्णायक ठरेल. आमचे खेळाडू, त्यातही वेगवान गोलंदाज स्वत:ला किती फिट ठेवतात, यावर यशाचे गमक ठरणार आहे. आॅस्ट्रेलियाच्या या मोठ्या दौऱ्याचा लाभ सांगायचा झाल्यास विश्वचषक येथेच असल्याने भारतीय खेळाडूंना वातावरणाशी एकरूप होता येईल. या दौऱ्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे लागेल.’११६ कसोटी आणि १२९ वन-डेत भारताचे प्रतिनिधित्व करणारे ५८ वर्षीय वेंगसरकर १९८३ मध्ये पहिलावहिला विश्वचषक जिंकलेल्या भारतीय संघाचे ते सदस्य होते. १९८७ ते १९८९ या काळात देशाचे कर्णधार म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. आॅस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत भारताच्या यशाचे गणित मांडताना वेंगसरकर यांनी सांगितले की, ‘ब्रिस्बेन येथे ४ डिसेंबरला सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीत कसा खेळ करतो, यावर विसंबून राहील. पहिल्या कसोटीच्या खेळावर आणि निकालावर उर्वरित मालिकेचे भाग्य ठरेल. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला तर कितीही भक्कम असलेल्या फलंदाजीवर दबाव आणता येईल.’ (क्रीडा प्रतिनिधी)
आॅस्ट्रेलिया दौऱ्यात ‘फिटनेस’ हीच यशाची गुरुकिल्ली : वेंगसरकर
By admin | Published: November 24, 2014 2:46 AM