सावर : खलील अहमदचे ३0 धावांत ५ बळी आणि सर्फराज खानच्या तडाखेबंद ८१ धावांच्या जोरावर अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या सराव सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६८ चेंडू राखून मोठा विजय मिळविला. सराव सामन्यातील दोन मोठ्या विजयांमुळे भारताने आपणच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे सिद्ध केले आहे.भारताने पहिल्या सराव सामन्यात कॅनडाविरुद्ध ४८५ धावांचा डोंगर उभारला होता. हा सामना त्यांनी ३७२ धावांनी जिंकला होता. आज दुसऱ्या सराव सामन्यात भारताने पाकिस्तानला ५ विकेटने धुतले.भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. त्यांचा सर्व संघ ४४.१ षटकांत १९७ धावांत गुंडाळण्यात भारताला यश आले. पाकिस्तानकडून मोहम्मद उमरने ३६, हसन मोहसिनने ३३, कर्णधार गौहर हफिजने २५ आणि सलमान फयाजने २९ धावा केल्या. भारताच्या डावखुऱ्या खलील अहमदने घातक गोलंदाजी करताना ८ षटकांत ३0 धावा देत पाकिस्तानचा निम्मा संघ तंबूत पाठविला. राहुल बॉथम, वॉशिंग्टन सुंदर, मयंक डागर, महिपाल लोमरोर आणि अरमान जाफरने प्रत्येकी एक बळी घेतला. पाकिस्तानचे आव्हान भारतीय धुरंधरांनी आपल्या फलंदाजीने सोपे बनविले. केवळ ३३.४ षटकांत पाच गडी गमावून १९८ धावा करीत हा सामना भारताने जिंकला. सर्फराज खानने ६८ चेंडूंत १२ चौकार आणि एका षटकाराच्या साहाय्याने ८१ धावांची विजयी खेळी केली. कर्णधार ईशान किशनने १५, रिषभ पंतने ११, रिकी भुईने १५, अरमान जाफरने १९, वॉशिंग्टन सुंदरने नाबाद २८ तर लोमरोरने नाबाद २२ धावा केल्या.संक्षिप्त धावफलकपाकिस्तान : ४४.१ षटकांत सर्व बाद १९७. (मोहम्मद उमर ३६, हसन मोहसिन ३३ धावा. खलील अहमद ५/३0.)भारत : ३३.४ षटकांत ५ बाद १९८ धावा. (सरफराज खान ८१, वॉशिंग्टन सुंदर नाबाद २८, लोमरोर नाबाद २२ धावा.)
खलील, सर्फराजने केला पाकचा खुर्दा
By admin | Published: January 26, 2016 2:42 AM