नवी दिल्ली : अखिल भारतीय टेनिस महासंघाचे अध्यक्ष अनिल खन्ना हे आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या (आयटीएफ) २०१५ ते २०१९ या कालावधीच्या अध्यक्षपदासाठी दावेदार असतील.गेल्या १६ वर्षांपासून आयटीएफच्या अध्यक्षपदावर असणाऱ्या फ्रान्सिस्को रिशी बिट्टी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता नवीन अध्यक्षपदासाठीची निवडणूक होणार आहे. २०१५ ते २०१९ या कालखंडासाठीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत एकूण चार उमेदवारांनी दंड थोपटले आहेत. त्यात भारताच्या अनिल खन्ना यांच्यासह अमेरिकेच्या डेव्हिड हॅगर्टी, स्पेनचे जुआन मार्गेंटस लोबाटो, स्वीत्झर्लंडच्या रेने स्टॅमबक यांचा समावेश आहे.आयटीएफच्या प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार नव्या अध्यक्षाची निवड शुक्रवारी चिली येथील सेंटियागोमध्ये होणाऱ्या वार्षिक बैठकीत होईल. सेंटियागोत चिली टेनिस फेडरेशनच्या यजमानात २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या सर्वसाधारण बैठकीत राष्ट्रीय संघटना, विभागीय संघटना आणि मान्यताप्राप्त संघटनेतील जवळपास २८0 जण सहभागी होणार आहेत. बैठकीत एकूण १३ पदांसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी २६ उमेदवार मैदानात असतील. याशिवाय आयटीएफच्या संचालक मंडळाचीही निवडणूक होईल. त्याचबरोबर डेव्हिस कप-२0१६ मध्ये पाच सेट टायब्रेकरच्या प्रस्तावांसह अन्य महत्त्वपूर्ण निर्णयावर मदतदान होणार आहे. (वृत्तसंस्था)
आयटीएफ अध्यक्षपदाच्या रिंगणात खन्ना
By admin | Published: September 23, 2015 11:03 PM