पुणे : महाराष्ट्राच्या मितिका गुणेलेने 17 वर्षांखालील मुलींच्या विभागात विजयी वाटचाल कायम ठेवीत उपांत्य फेरी गाठली व पदक निश्चित केले. तिने 66 किलो गटातील उपांत्यपूर्व फेरीत हरयाणाच्या अन्नू राणीचा 5-0 असा सहज पराभव केला.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया युथ गेम्स ही स्पर्धा सुरु आहे. पहिल्या फेरीपासून मितिकाने या लढतीवर नियंत्रण मिळवले होते. तिने तिन्ही फेऱ्यांमध्ये आक्रमक ठोसेबाजी करत अन्नूला फारशी संधी दिली नाही. मितिकाने आतापर्यंत युक्रेन, सर्बिया, पोलंड व कझाकिस्तान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. या चार स्पर्र्धांमध्ये तिने दोन सुवर्ण व एक रौप्यपदक अशी तीन पदके मिळवली आहेत. ती कांदिवली (मुंबई) येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणात प्रतिभा जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मितिकाने सांगितले, माझे ध्येय सुवर्णपदकाचेच आहे. परदेशातील स्पर्धांमधील अनुभव मला येथे खूप फायदेशीर ठरला आहे. येथे माज्यावर कोणतेही दडपण नाही. येथे सर्वोच्च कामगिरी करण्याचेच माझे ध्येय आहे. ही स्पर्धा माज्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे ध्येय आहे. त्यासाठी आतापासूनच माझे प्रयत्न राहणार आहेत.
आकाश गोरखाचीही आगेकूच
महाराष्ट्राच्या आकाश गोरखाने मुलांच्या गटात आव्हान राखले. त्याने 17 वर्षांखालील 57 किलो वजनी विभागात आपलाच सहकारी थांगजामचा याच्यावर 3-2 अशी मात केली. 60 किलो गटात महाराष्ट्राच्या रोहन पंडेरेला मात्र उत्तरप्रदेशच्या राहुल मेमेगेने 3-2 असे हरवले. 60 किलो गटात महाराष्ट्राच्या लैश्राम सिंगने पदकाच्या दिशेने वाटचाल राखताना आसामच्या इमदाद हुसेन याचे आव्हान 5-0 असे संपुष्टात आणले. आकाशकुमार या महाराष्ट्राच्या खेळाडूला 66 किलो विभागात उत्तराखंडच्या पंकजकुमारने 3-2 असे पराभूत केले. महाराष्ट्राच्या अमनदीपसिंग याचे आव्हान संपुष्टात आले. त्याला हरयाणाच्या सुमीतकुमार याने 5-0 असे निष्प्रभ केले.
टेनिसमध्ये आर्यन, मिहिका अंतिम फेरीतपुणे : आर्यन भाटिया व मिहिका यादव या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपराजित्व राखून टेनिसमधील अनुक्रमे 17 वर्षांखालील मुले व 21 वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या गार्गी पवार, प्रेरणा विचारे यांनीही अपराजित्व राखताना टेनिसमधील वाटचाल कायम राखली.
मुलांच्या 17 वर्षांखालील गटात आर्यनने अग्रमानांकित सुशांत दबस या हरयाणाच्या खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवला. त्याने उत्कंठापूर्ण लढतीत 7-5, 3-6, 6-2 असा विजय मिळवला. या विजयासह त्याने अंतिम फेरी निश्चित केली. मुलींच्या 21 वर्षांखालील एकेरीत मिहिकाने उपांत्य फेरीत उत्तरप्रदेशच्या काव्या सवानीवर 6-3. 6-3 असा सरळ दोन सेट्समध्ये विजय मिळवला.
मुलींच्या 17 वर्षांखालील गटात गार्गीने हरयाणाच्या अंजली राठीवर 6-2, 6-7 ( 4-7), 6-3 अशी मात केली. याच वयोगटात प्रेरणाने तामिळनाडूच्या एस.पांडिथिराला 4-6, 6-3, 7-6 (7-5) असे पराभूत केले.