पुणे : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया 2019 मध्ये जिम्नॅस्टिक्समधील वर्चस्व कायम राखताना रविवारी तीन सुवर्णपदकांची कमाई केली. आदिती दांडेकरने दोन प्रकारात, तर रिचा चोरडिया व अरिक डे यांनी प्रत्येकी एक सुवर्णपदक मिळवत महाराष्ट्राच्या यशात महत्त्वाचा वाटा उचलला. जिम्नॅस्टिक्सच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राने चार रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई केली. मुलींच्या 21 वर्षांखालील क्लब्ज प्रकारात रिचाने 11.65 गुण नोंदवत सुवर्णपदक जिंकले. तिची सहकारी आदितीने 10.75 गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर दिल्लीच्या मेहकप्रीत कौरने 10 गुणांसह कांस्यपदकाची कमाई केली. आदितीने रिबन्स प्रकारात सोनेरी कामगिरी करताना 12.15 गुणांची नोंद केली. तेलंगणाच्या जी.मेघना रेड्डीने 10.50 गुणांसह रौप्यपदक पटकावले. मेहकप्रीतला या प्रकारातही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. आदितीने चेंडू प्रकारातही सुवर्णपदकांची नोंद केली तिने 12.65 गुण नोंदवले. जी.मेघना रेड्डी (त्रिपुरा) व किमया कदम (महाराष्ट्र) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवले. आदितीला हूप प्रकारात रौप्यपदक मिळाले. तिने 10.45 गुण मिळवले. मेघना रेड्डीने 11.05 गुणांसह सुवर्णपदक पटकावले.हॉरिझोन्टल बार या प्रकारात अरिकने सुवर्णपदक जिंकताना 12.25 गुण नोंदवले. त्याचा सहकारी ओंकार शिंदेने रौप्यपदक मिळवताना 11.40 गुणांची कमाई केली. दिल्लीच्या इसाक अन्वरने 11.15 गुणांसह कांस्यपदक पटकावले. समांतर बार प्रकारात अरिकला रौप्यपदक मिळाले. त्याने 12.30 गुण मिळवले. अग्निवेश पांडे (उत्तरप्रदेश) याने 12.45 गुणांसह सुवर्णपदक जिंकले. पंजाबच्या आर्यन शर्माने 11.25 गुणांसह कांस्यपदक मिळवले.