तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षांखालील मुलांच्या संघांनी कबड्डीची उपांत्य फेरी गाठली. येथील लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक संस्थेच्या संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत शनिवारी महाराष्ट्राच्या मुलांनी अपेक्षित कामगिरी करताना अखेरच्या साखळी सामन्यात सफाईदार विजय मिळविले.
सकाळच्या सत्रात २१ वर्षांखालील संघाने चंढिगडचे आव्हान ३९-३०, तर १७ वर्षांखालील संघाने यजमान आसामचे आव्हान ४८-१७ असे परतवून लावले. २१ वर्षांखालील गटात महाराष्ट्राचा संघ गटात विजेता ठरला. आता त्यांची गाठ उत्तर प्रदेश संघाशी पडेल. १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्र संघ उपविजेता राहिला. त्यांची गाठ राजस्थान संघाशी पडेल.
मुलांच्या २१ वर्षांखालील संघाच्या विजयात सौरभ पाटील आणि पंकज मोहिते यांच्या खोलवर चढायांबरोबर त्यांनी मैदानात आखलेल्या डावपेचांचा महत्वाचा वाटा राहिला. इस्लाम इनामदारची अष्टपैलू साथ त्यांना मिळाली. वैभव घुगेच्या पकडीही चांगल्या झाल्या.
मुलांच्या १७ वर्षांखालील संघाने दुपारच्या सत्रात आसामचा ४८-१७ असा पराभव केला. शुभम पठारे, संदेश देशमुख यांच्या चढायांना, बचावात कृष्णा शिंदे आणि संकेत बिल्ले यांची पूरक साथ मिळाली व महाराष्ट्राचा मोठा विजय साकार झाला. सामना जिंकत असतानाच संघ व्यवस्थापनाने अखेरच्या पाच मिनिटात आपल्या राखीव खेळाडूंचीही तयारी अजमावून घेतली.