महाराष्ट्राच्या शेतकऱ्याच्या पोरींनी खेलो इंडिया 2020मध्ये गुणवत्तेच्या आधारे पदकांच्या यादीत स्थान मिळवले. महाराष्ट्राच्या रिंकी पावरा व पूनम सोनुने यांनी खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात मैदानी स्पर्धेत पदकाची कमाई केली.
नंदुरबार जिल्ह्यातील खर्डी या आदिवासी गावात छोटीशी शेती असलेले धन्या पावरा यांची कन्या रिंकीने येथील 17 वर्षांखालील मुलींच्या गटात ३ हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत ती प्रथमच सहभागी झाली आहे. या शर्यतीत तिने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. मात्र शेवटच्या ३०० मीटर्समध्ये पायातील वेदनांमुळे तिने आघाडी गमावली. झारखंडची सुप्रिती कश्यप (१० मिनिटे २ सेकंद) व गुजरातची दृष्टीबेन प्रविणभाई (१० मिनिटे ४.७६ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. रिंकीने १० मिनिटे ५.३३ सेकंदात ही शर्यत पार केली.
रिंकीने २०१८ मध्ये मॅरेथॉन शर्यतीत भाग घेतला होता. तेथे तिने केलेली कौतुकास्पद कामगिरी पाहून नाशिक येथील ख्यातनाम प्रशिक्षक विजेंदरसिंग यांनी तिला आपल्या अकादमीत प्रशिक्षणाची संधी दिली. गतवर्षी तिची सिंगापूरमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पधेर्साठी निवड झाली होती. मात्र वेळेवर पासपोर्ट न मिळाल्यामुळे तिला त्या स्पर्धेत भाग घेता आला नव्हता. रिंकीने पंजाबमध्ये नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत ३ हजार मीटर्स शर्यतीत रौप्यपदक पटकाविले होते.
यशाचे श्रेय बाबांनाच- रिंकीदोन वर्षांपूर्वी मी बºयाच शर्यतींमध्ये अनवाणीच धावत असे. धावण्यासाठी आवश्यक असणारे बूट घेणे मला शक्य नव्हते. राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतरच मला बाबांनी बूट घेऊन दिले. खेळाडूंच्या पोशाखात मी जात असताना आमच्या खेडेगावातील लोकांच्या भुवया उंचावल्या जात असत. मात्र स्पर्धांमध्ये मला बक्षीसे मिळू लागल्यानंतर गावातील लोक माझे कौतुक करू लागले आहेत, असे रिंकी हिने सांगितले.
आजारी असूनही पूनम सोनुने हिचा सहभागविजेंदर यांचीच शिष्या पूनमने गतवर्षी पुण्यातील खेलो इंडिया स्पर्धेत ५ हजार मीटर्सची शर्यत जिंकली होती. यंदा येथे तिला विजेतेपद टिकविता आले नाही. मंगलोर येथे नुकत्याच झालेल्या आंतर विद्याापीठ स्पर्धेत तिने १० हजार मीटर्समध्ये सुवर्णपदक मिळविले होते. ही स्पर्धा संपवून येथे येताना ती तापाने आजारी पडली. तरीही तिने येथे भाग घेतला. तिला येथे ५ हजार मीटर्सचे अंतर पार करण्यास १७ मिनिटे २१.६ सेकंद वेळ लागला. हरियाणाची अंकिता (१६ मिनिटे ३८.७५ सेकंद) व गुजरातची रिना पटेल (१६ मिनिटे ४६.२० सेकंद) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले. पूनम ही मूळची बुलढाणा येथील असून तिचे वडील शेती करतात. ती सध्या नाशिक येथील भोसला मिलिटरी महाविद्याालयात प्रथम वर्ष कला शाखेत शिकत आहे. तिने गतवर्षी पुण्यातील खेलो इंडिया स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले होते.