महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे तिसऱ्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये जिम्नॅस्टिक्समध्ये आपला दबदबा कायम राखला. स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात अस्मी बडदेने आणखी तीन सुवर्णपदकांची कमाई करीत आपले पदार्पण सार्थ ठरविले. श्रेया बंगाळे हिने आपल्या नावावर सुवर्णपदकांची नोंद करीत संघाच्या वर्चस्वाला हातभार लावला.
अस्मीने काल रिदमिक सर्वसाधारण प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. त्यामध्ये तिने शनिवारी चेंडू, दोरी व रिबन प्रकारातील सुवर्णपदकांची भर घातली. क्लब रँक प्रकारात तिला रौप्यपदक मिळाले. या प्रकारात श्रेया बंगाळे हिने तिला मागे टाकून सोनेरी कामगिरी केली. श्रेयाने दोरी प्रकारात रौप्यपदक तर चेंडू प्रकारात ब्राँझपदक पटकाविले.अस्मी व श्रेया या दोन्ही खेळाडू ठाणे येथे पूजा व मानसी सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. अस्मी ही १४ वर्षीय खेळाडू ठाणे येथील ज्ञानसाधना विद्याामंदिर प्रशालेत शिकत आहे. रिबन प्रकारात महाराष्ट्राच्या मैत्रेयी शेलूकरने रौप्यपदकाची कमाई केली.
मुलांच्या १७ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या ओंकार धनावडे (११.२५ गुण) व आर्यन नहाते (११.१५ गुण) यांनी समांतर बार प्रकारात अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळविले. या प्रकारात उत्तरप्रदेशच्या जतीन कनोजियाने १२.३० गुणांसह सुवर्णपदक पटकाविले.