गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिसऱ्या पर्वात महाराष्ट्राच्या मुलांनी कबड्डीत विजयी श्रीगणेशा केला. महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षांखालील संघांनी प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळविले. प्रथम २१ वर्षांखालील संघाने गुजरातचा ५०-४२ असा पराभव केला. त्यानंतर अखेरच्या सामन्यात १७ वर्षांखालील संघाने छत्तीसगढ संघावर एकतर्फी लढतीत ५१-२८ अशी सहज मात केली.
गुवाहटीपासून तब्बल ३८ कि.मी. दूर असलेल्या सोनापूर येथील क्रीडा संकुलात या स्पर्धांना आजपासून सुरवात झाली. महाराष्ट्राच्या युवा खेळाडूंनी विजय मिळविला असला, तरी त्यांनी पुढील प्रवासाचा विचार करता बचावाच्या आघाडीवर मेहनत घ्यावी लागणार हे या पहिल्याच लढतीने दाखवून दिले. मुलांच्या १७ वर्षांखालील संघाने छत्तीसगढ संघाचा अगदीच सहज पराभव केला. त्यांच्या खोलवर चढाया विजयात महत्त्वाच्या ठरल्या.आधीच्या सामन्यात २१ वर्षांखालील मुलांकडून बचावात चुका झाल्या होत्या. मात्र, या मुलांनी जणू त्यातून धडा घेत महाराष्ट्राचे सुरवातीपासून मिळविलेले वर्चस्व अखेरपर्यंत कायम राखले. पूर्वार्धात दोन आणि उत्तरार्धात एक असे तीन लोण चढवत महाराष्ट्राच्या मुलांनी छत्तीसगढच्या मुलांना खेळ दाखविण्याची संधीच दिली नाही.
शुभम पठारेच्या चढाया इतक्या जबरदस्त होत्या की छत्तीसगढचा बचाव पूर्णपणे खिळखिळा करून टाकला होता. त्याला कृष्णा शिंदे आणि दिग्विजय जमदाडेची सुरेख साथ मिळाली. कृष्णाच्या पकडी सुरेख झाल्या. यातही छत्तीसगढवर पूर्वार्ध संपताना महाराष्ट्राने दिलेला लोण नाट्यमय ठरला. या वेळी शुभमने एका चढाईत छत्तीसगढचे पाच खेळाडू बाद केले. छत्तीसगढच्या खेळाडूंनी त्याची पकड केली होती. पाच खेळाडूंनी त्याला अक्षरश: जखडून ठेवले होते. मात्र, अशा स्थितीतही शुभमने आपला हात सोडवून घेत मध्यरेषेला टेकवला. त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कधीच मागे वळून पाहिले नाही. मध्यताराला २७-१३ अशी मिळविलेली आघाडी त्यांनी विजय मिळवताना ५१-२८ अशी २५ गुणांपर्यंत वाढवली.
त्यापूर्वी, २१ वर्षांखालील सामन्यात पहिल्याच चढाईला महाराष्ट्राच्या खेळाडूंची घाई दिसून आली. या पहिल्या चढाईलाच महाराष्ट्राने दोन गुण गमावले. अपयशाने झालेल्या सुरवातीमुळे महाराष्ट्राचे खेळाडू दडपण घेणार की काय अशी शंका आली. मात्र, पंकज मोहितेच्या चढायांनी महाराष्ट्राचा मार्ग सुकर करण्यास सुरवात केली. त्याच्या चढाया गुजरातच्या बचावपटूंसाठी आव्हानात्मक ठरत होत्या. त्याला सौरभ पाटिल आणि अस्लम इनामदार यांची साथ मिळाली. वेगवान चढाया महाराष्ट्राच्या खेळाचे वैशिष्ट्य ठरत होत्या. मात्र, त्यांना बचावच्या आघाडीकडून फारशी साथ मिळाली नाही.
बचावपटूंकडून होत असलेल्या चुकांनंतरही महाराष्ट्राने मध्यंतराला २२-१४ अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात मात्र, महाराष्ट्राच्या बचावपटूंकडून पुन्हा एकदा घाई करण्याच्या नादात चुका होत राहिल्या. त्यामुळे पहिल्या सत्रात एकदा आणि दुस-या सत्रात एक असे दोन लोण दिल्यानंतरही महाराष्ट्राला सामन्यावर पूर्ण पकड मिळवता आली नाही. त्याचा फटका त्यांना बसला. त्यांना एक लोण स्विकारावा लागला. अखेरच्या सात मिनिटात महाराष्ट्राच्या बचावपटूंच्या चुकांमुळे गुजरातला सामन्यात पुन्हा परतण्याची संधी निर्माण झाली होती. एकवेळ अखेरच्या चार मिनिटातल्या ४३-३७ अशा आघाडीनंतरही महाराष्ट्रावर दुसरा लोण बसण्याची वेळ आली. मात्र, त्यावेळी प्रशिक्षकांनी घेतलेल्या कानपिचक्यांनी महाराष्ट्राचे खेळाडू भानावर आले. त्यांनी चार मिनिटे घाई न करता सावध खेळ करून आघाडी वाचविण्याचे काम करत विजय मिळिवला. मात्र, एकवेळ असलेल्या पूर्ण वर्चस्वानंतरही महाराष्ट्राला आठ गुणांच्या फरकाची खंत नक्कीच वाटत असेल.
महाराष्ट्राचे प्रशिक्षक बजरंग परदेशी यांनी बचावपटूंच्या चुका झाल्याचे मान्य केले. मात्र, उद्यापासून आपली बचावातील कामगिरीही सुधारलेली दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला.
पहिल्याच दिवशी किटचा घोळ
महाराष्ट्रच नाही, तर अनेक राज्याच्या खेळाडूंना वेळेवर किट उपलब्ध होऊ न शकल्यामुळे कबड्डीच्या सामन्यांना या ना त्या कारणाने उशीर होत राहिला. महाराष्ट्राच्या १७ वर्षांखालील मुलांचे किट तर दुपारचे सत्र संपताना ४.३० वाजता आले. त्यामुळे महाराष्ट्राचा सामना उशिराने खेळवावा लागला. अर्थात, हे किटही चुकीचे आले होते. १७ वर्षांखालील मुलांना मोठ्या साईजचे किट आले. मात्र, वेळ मारून नेण्यासाठी त्यांना तशाच किटसह खेळावे लागले.