गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी वेटलिफ्टिंगमध्ये पदकांची लयलूट कायम ठेवताना येथे शनिवारी आणखी दोन सुवर्णपदके तसेच एक रौप्य व एक ब्राँझपदकाची भर घातली.
युवा विभागाच्या ६१ किलो गटात अनिरुद्ध निपणे या कोल्हापूरच्या खेळाडूने स्नॅचमध्ये १०२ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १२८ किलो असे एकूण २३० किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकाविले. अनिरुद्धला गेल्या दोन खेलो इंडिया स्पर्धांमध्ये पदकाने हुलकावणी दिली होती. येथे मात्र त्याने निधार्राने कौशल्य दाखवित सुवर्णपदक पटकाविले.
त्याचा भाऊ अभिषेक हादेखील वेटलिफ्टर असून त्याला येथील ६७ किलो गटात ब्राँझपदक मिळाले. त्याने स्नॅचमध्ये ११० किलो तर क्लीन व जर्कमध्ये १४३ किलो असे एकूण २५३ किलो वजन उचलले. अनिरुद्ध व अभिषेक यांचे वडील शेतकरी आहेत. या दोन्ही खेळाडूंना कुरुंदवाड येथील प्रदीप पाटील यांचे मार्गदर्शन मिळत आहे. याच प्रशिक्षकांचा विद्याार्थी तेजस जोंधळे याने ६७ किलो गटात रौप्यपदक मिळविले. त्याने अनुक्रमे ११५ व १४२ असे एकूण २५७ किलो वजन उचलले.
पुण्याची खेळाडू अनन्या हिने कनिष्ठ विभागाच्या ५५ किलो गटात स्नॅचमध्ये ७५ तर क्लीन व जर्कमध्ये ८९ किलो असे एकूण १६४ किलो वजन उचलले. तिची आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. तिचे वडील विजय पाटील हे पॉवरलिफ्टिंगमधील ज्येष्ठ खेळाडू आहेत. ती सध्या कुरुंदवाड येथील हर्क्युलस अकादमीचीही खेळाडू असून पतियाळा येथे राष्ट्रीय प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण घेत आहे.* जलतरणात दोन सुवर्णपदके महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मुलींच्या विभागात दोन सुवर्णपदकांची कमाई केली. मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने ४ बाय १०० मीटर्स फ्रीस्टाईल रिलेचे सुवर्णपदक पटकाविले. अपेक्षा फर्नान्डीस, करिना शांता, कियारा बंगेरा व केनिशा गुप्ता यांचा समावेश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत ४ मिनिटे ५.८६ सेकंदांत पार केली. २१ वर्षाखालील मुलींच्या गटातही महाराष्ट्राने या शर्यतीचे विजेतेपद ्िमळविले. ऋतुजा तळेगावकर, राधिका गावडे, युगंधरा शिर्के व साध्वी धुरी यांचा समोवश असलेल्या महाराष्ट्राने ही शर्यत ४ मिनिटे २०.०५ सेकंदांत पूर्ण केली. कायरा बंगेराने १७ वषार्खालील गटात ४०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत ब्राँझपदक मिळविले. तिने ४ मिनिटे ३८.९५ सेकंद अशी वेळ नोंदविली. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या वेदांत बापनाने १०० मीटर्स बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळविले. त्याला ही शर्यत ५९.५६ सेकंदांत पूर्ण केले. त्याचाच सहकारी वेदांत माधवन याने याच वयोगटात १५०० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत ब्राँझपदकाची कमाई केली. त्याने हे अंतर १७ मिनिटे ०.७९ सेकंदांत पूर्ण केले.*टेनिसमध्ये मिहिकाची आगेकूच महाराष्ट्राच्या मिहिका यादवने मुलींच्या २१ वर्षाखालील गटात अपराजित्व राखले. तिने पंजाबच्या सराह देव हिचा ६-१, ६-० असा धुव्वा उडविला. मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या साहेब सोधी याला पंजाबच्या ध्रुव तांगरीने ६-४, ६-४ असे हरविले तर हरयाणाच्या कृष्णन हुडा याने महाराष्ट्राच्या संदेश कुरळे याचा ६-३, ६-० असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.* बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राची हरियाणावर मात महाराष्ट्राने बास्केटबॉलमधील मुलींच्या १७ वर्षाखालील गटात हरयाणाचा ७३-५८ असा पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी ३५-३२ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राच्या विजयात तन्वी साळवी व सिया देवधर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.* नेमबाजीत दोन ब्राँझ महाराष्ट्राने नेमबाजीत दोन ब्राँझपदकाची कमाई केली. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात यशिका शिंदे हिने ५० मीटर्स रायफल थ्रीपोझिशन प्रकारात ब्राँझपदक मिळविले. एअर पिस्तूलच्या मिश्रदुहेरीत हर्षदा निठवे व साईराज गणेशकाटी यांनी ब्राँझपदकाचा मान मिळविला.