आसाम, गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राचे आंतरराष्ट्रीय खेळाडू मिहिर आम्ब्रे व एरॉन फर्नान्डीस यांनी अनुक्रमे ५० मीटर बटरफ्लाय व २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ंिजंकून जलतरणात सोनेरी सलामी केली. महाराष्ट्राच्या करिना शांता हिने १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करीत सुवर्णपदक पटकाविले. याच शर्यतीत महाराष्ट्राच्याच अपेक्षा फर्नान्डीस व झारा जब्बर यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक पटकावित संघाचे वर्चस्व राखले.
जलतरणाच्या पहिल्याच दिवशी करिनाने २१ वर्षाखालील मुलींमध्ये १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत एक मिनिट १४.६६ सेकंदात पार केले आणि कर्नाटकच्या सलोनी दलाल हिने दोन वर्षांपूर्वी नोंदविलेला एक मिनिट १४.८७ सेकंद हा विक्रम मोडला. ती मुंबई येथे धीरुभाई अंबानी महाविद्यालयात शिकत आहे. गतवर्षी तिने दोन सुवर्णपदके जिंकली होती. याच शर्यतीत अपेक्षा (एक मिनिट १५.४७ सेकंद) व झारा (एक मिनिट १९.०२ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळविले.
पुण्याचा खेळाडू मिहिर याने २१ वर्षाखालील गटात ५० मीटर बटरफ्लाय शर्यत २५ सेकंदांत जिंकली. तो गरवारे कॉमर्समध्ये शिकत असून त्याला विनय मराठे व निहार अमीन यांचे मार्गदर्शन मिळत आहे. गतवर्षी पुण्यात झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत भरघोस पदकांची कमाई केली होती. महाराष्ट्राच्या एरॉन फर्नान्डीस याने याच वयोगटात २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यत एक मिनिट ५६.५१ सेकंदांत पार करीत सुवर्णपदक पटकाविले. तो मुंबईचा खेळाडू असून त्याने रा्ष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट केली आहे.
महाराष्ट्राच्या कियारा बंगेरा हिने १७ वर्षाखालील गटात २०० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत रौप्यपदक मिळविताना २ मिनिटे १२.१६ सेकंद वेळ नोंदविली. याच वयोगटात केनिशा गुप्ता या महाराष्ट्राच्या खेळाडूला ५० मीटर बटरफ्लायमध्ये रौप्यपदक मिळाले. तिने ही शर्यत २८.९६ सेकंदांत पार केली.* फोटो ओळ : आसाम, गुवाहटी येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात जलतरणात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करीत पदकांची कमाई केली.