गुवाहटी : उत्तरार्धात अंकिता सपाटे हिने केलेल्या सुरेख गोलाच्या जोरावर महाराष्ट्राने बलाढ्य झारखंडवर १-० असा निसटता विजय नोंदवित २१ वर्षाखालील मुलींच्या गटात शानदार सलामी केली. मात्र २१ वर्षाखालील मुलींच्या गटात महाराष्ट्राला झारखंड संघानेच ८-२ असे निष्प्रभ केले.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात अंकिताने उत्तरार्धाच्या प्रारंभीच जोरदार चाल केली आणि प्रतिस्पर्धी संघाच्या दोन खेळाडूंना चकवित गोल नोंदविला. हा गोल झाल्यानंतर झारखंडच्या खेळाडूंनी सातत्याने चाली केल्या. त्यांना शेवटच्या सात मिनिटांमध्ये पेनल्टी कॉर्नरही मिळाला. मात्र, महाराष्ट्राची गोलरक्षक सुश्मिता पाटीलने अप्रतिम गोलरक्षण करीत त्यांच्या चाली असमर्थ ठरविल्या. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शेवटच्या १० मिनिटांमध्ये गोल करण्याच्या तीन-चार संधी वाया घालविल्या. अन्यथा त्यांना हा सामना चार गोलांच्या फरकाने जिंकता आला असता.
महाराष्ट्राला १७ वर्षाखालील गटात झारखंडच्या आक्रमक खेळापुढे निभाव राखता आला नाही. झारखंडकडून निक्की कुल्लु व एलिना डुंगडुंग यांनी प्रत्येकी दोन गोल करीत मोठा वाटा उचलला. महाराष्ट्राकडून उत्कर्षा काळे व हिमांशी गावंडे यांनी प्रत्येकी एक गोल करीत चांगली लढत दिली.