गुवाहाटी : ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’च्या तिसऱ्या सत्रात सायकलिंग प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आश्वासक कामगिरी करताना रविवारी दोन सुवर्णपदके जिंकली. २१ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये मधुरा वायकर आणि १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पूजा दानोळे यांनी बाजी मारली.
मधुराने २० किलोमीटर शर्यतीत ३० मिनिटे ३६.५९४ सेकंद वेळ देत अव्वल स्थान पटकावले. मेघा जी. आणि सौम्या अंतापूर या कर्नाटकच्या खेळाडूंना अनुक्रमे दुसºया आणि तिसºया क्रमांकावर समाधान मानावे लागले. पूजा १७ वर्षांखालील मुलींच्या १५ किलोमीटर शर्यतीत विजेती ठरली.
१७ वर्षांखालील मुलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या आकाशसिंगला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. १०.९५ सेकंद वेळ देणारा झारखंडचा सदानंदकुमार या गटातील वेगवान धावपटू ठरला. २१ वर्षांखालील मुलींची १०० मीटर धावण्याची शर्यत केरळच्या अॅन्सी सोजन हिने १२.२१ सेकंद वेळेसह जिंकली. १२.३८ सेकंद वेळ देणाºया महाराष्ट्राच्या कीर्ती भोईटेच्या वाट्याला कांस्यपदक आले. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये २१ वर्षांखालील मुलांच्या गटात ओंकार शिंदेने ६८.७० गुणांसह महाराष्ट्राला रौप्यपदक जिंकून दिले. ७२.३० गुण घेणारा उत्तर प्रदेशचा गौरवकुमार सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. अभय गुरवने २१ वर्षांखालील उंच उडीत आणि पूर्वा सावंतने १७ वर्षांखालील तिहेरी उडीत दबदबा राखताना महाराष्ट्रासाठी सुवर्ण पदक पटकावले. अभयने २.०७ मीटरची सुवर्ण झेप घेतली. तसेच पूर्वाने पहिल्याच ११.८९ मीटरची उडी घेत आपले वर्चस्व राखले.