गुवाहटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे जिम्नॅस्टिक्समध्ये सर्वसाधारण विजेतेपद पटकावित निर्विवाद वर्चस्व गाजविले. या क्रीडा प्रकारातील शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या आदिती दांडेकर हिने २१ वर्षाखालील रिदमिक विभागात हूप व क्लब प्रकारात सोनेरी कामगिरी केली आणि महत्त्वाचा वाटा उचलला. तसेच तिने चेंडू प्रकारात रौप्यपदक तर रिबन प्रकारात ब्राँझपदकाची कमाई केली.
रिचा चोरडियाने हूप व चेंडू प्रकारात ब्राँझपदक मिळविले. अनन्या सोमणने रिबनमध्ये रौप्यपदक तर क्लब प्रकारात ब्राँझपदकावर नाव कोरले. वैदेही देऊळकर हिला व्हॉल्ट प्रकारात ब्राँझपदक मिळाले. मुलांच्या २१ वर्षाखालील गटात श्रेयस चौधरी याने हॉरिझॉन्टल बार प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. त्याचा सहकारी ओंकार शिंदे याला ब्राँझपदक मिळाले.* नेमबाजीत हर्षवर्धनला सुवर्ण नेमबाजीत २५ मीटर रॅपिड फायर प्रकारात पुण्याच्या हर्षवर्धन यादव याने पात्रता फेरीतील चुका सुधारून अंतिम फेरीत सरस नेमबाजी करताना २१ वर्षांखालील गटात सुवर्णपदक मिळविले. हर्षवर्धन ५६८ गुणांसह तिस-या क्रमांकाने अंतिम फेरीसाठी पात्र ठरला होता. त्यानंतर अंतिम फेरीत त्याने अधिक अचूकता राखताना ३१ गुणांसह सुवर्णपदक पटकावले. हरियानाचा आयुष सिगं रौप्य, तर पंजाबचा राजकंवर सिंग ब्रॉंझपदकाचा मानकरी ठरला.*संपदाला ज्युडोत रौप्य महाराष्ट्राच्या संपदा फाळके हिला ज्युडोमध्ये २१ वर्षांखालील गटात ७८ पेक्षा कमी किलो वजन प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत तिला मणिपूरच्या माबाम इंदुबाला हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यापूर्वी पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर तिने केरळच्या ज्योलसाना हिला हरवून अंतिम फेरी गाठली होती.
*टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राला तीन रौप्य महाराष्ट्राच्या रिगान अलबुकर्क, सृष्टी हेलंगडी व ह्रषिकेश मल्होत्रा यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मुलांच्या १७ वषार्खालील गटात ह्रषिकेश याला अंतिम लढतीत दिल्लीच्या आदर्श छेत्री याने १४-१२, ८-११, ११-३, ११-९, ११-८ असे हरविले. २१ वषार्खालील गटात रिगान याला तेलंगणाच्या फिडेल रफिक सूरवजुला याने पराभूत केले. रिगान याने हा सामना ११-९, १०-१२, १०-१२, ११-५, ८-११, ६-११ असा गमावला. मुलींच्या २१ वषार्खालील गटात अनुष्का कुटुंबळे या मध्यप्रदेशच्या खेळाडूने सृष्टीचा ११-४, ११-९, ११-३, ११-३ असा पराभव केला.