या केंद्रांतर्गत आर्चरी, अॅथ्लेटिक्स, बॉक्सिंग, बॅडमिंटन, सायकलिंग, तलवारबाजी, हॉकी, ज्युडो, रोर्इंग, शुटिंग, जलतरण, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती, फुटबॉल आणि पारंपरिक खेळांचा समावेश करण्यात आला आहे.केंद्र शासनाने ‘खेलो इंडिया’ योजनेंतर्गत देशभरात एक हजार क्रीडा केंद्रउभारण्याची योजना आखली असून त्यातील मोजकीच केंद्र महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहेत. राज्यातील १२.३ कोटी लोकसंख्येचा विचार करता यातील किमान शंभर केंद्र महाराष्ट्रात होणे काळाची गरज आहे. मात्र ‘खेळ’ हा लोकप्रतिनिधींच्या जिव्हाळ्याचा तसेच प्राधान्यक्रमाचा विषय नसल्याने पाठपुरावा करण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही.
सरकारने २३ ऑगस्ट २०१८ लायासंदर्भात सर्व राज्यांना नियमावली पाठवून खेळप्रकार निवडण्यास सांगितले होेते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने क्रीडा उपसचिवांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (साई) ७ आॅगस्ट २०२० ला प्रस्ताव सादर केला. त्यानुसार पुण्यातील बालेवाडी येथे शुटिंग, सायकलिंग, अॅथ्लेटिक्स आणि ज्युडो तर नागपूरच्या विभागीय क्रीडासंकुलात अॅथ्लेटिक्स केंद्र मागितले. अकोला येथील जिल्हा क्रीडासंकुलात बॉक्सिंग तसेच चंद्रपूरच्या बल्लारपूर तालुका केंद्रासाठी अॅथ्लेटिक्स, आर्चरी आणि बॉक्सिंग केद्र मागितले आहे.अर्थात सहा खेळांच्या एकूण नऊ केंद्रांची ही मागणी आहे.
औरंगाबाद विभागात परभणी आणि हिंगोली, लातूर विभागात लातूर शहर आणि नांदेड, कोल्हापूर विभागात कोल्हापूर तसेच सातारा, पुणे विभागात अहमदनगर, नाशिक विभागात जळगाव आणि धुळे, मुंबई विभागात धारावी संकुल तसेच कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये खेलो इंडियाची केंद्र असावीत, असे राज्य शासनाला वाटत नाही काय? एकूण लोकसंख्येत महाराष्ट्रच्या संख्येचा वाटा दहा टक्के असून राज्याने विविध खेळात नेहमीच उज्ज्वल कामगिरी केली आहे. आतापर्यंत झालेल्या तीन ‘खेलो इंडिया’ स्पर्धेच्या पदक तालिकेवर नजर टाकल्यास याचा प्रत्यय येईल. पहिल्या आयोजनात महाराष्ट्र दुसऱ्या तर नंतरच्या दोन्ही आयोजनात अव्वल स्थानावर होता. अनेक देशी आणि पारंपरिक खेळांचे माहेरघर अशी राज्याची ओळख आहे. कबड्डी, खोखो, कुस्ती, नेमबाजी, बॅडमिंटन, टेनिसमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे.क्रीडा खाते, लोकप्रतिनिधी, प्रशासन, राजकीय नेते यांच्या सन्मवयातून राज्याची मागणी पूर्ण होऊ शकते. मात्र त्यासाठी प्रयत्न आणि पाठपुराव्याची गरज आहे. सर्व खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात किमान १०० केद्र उभारण्याची तयारी असायला हवी, असे कळकळीचे आवाहन भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे संयुक्त सचिव नामदेव शिरगावकर यांनी केले. यासाठी आपण केंद्र शासनाकडे पाठपुरावा करायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारतीय बॉक्सिंग संघटनेचे महासचिव जय कवळी म्हणाले, ‘खेलो इंडियाची अधिकाधिक केंद्र राज्यात क्रीडा संस्कृतीची बीजे रुजवतील. त्यादृष्टीने नवे क्रीडाधोरण तयार व्हायला हवे.’‘बॉक्सिंग हा खेळ गावागावात नेण्याचा प्रयत्न केला. त्याची फलश्रुती म्हणजे खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला मिळालेल्या एकूण पदकात २५ टक्के वाटा बॉक्सिंगचा होता. इतरही खेळांच्या विकासासाठी किमान १०० केंद्र राज्यानेस्थापन करण्याचा अट्टाहास केद्राकडे करावा, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे.’ -जय कवळी, महासचिव, बीएफआय