आसाम, गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात महाराष्ट्राच्या श्रुती कांबळे हिने १७ वर्षाखालील गटात उंच उडीत सुवर्णवेध घेतला आणि या स्पर्धेतील पदार्पणातच नेत्रदीपक कामगिरी केली. तिच्या सहकारी रिया पाटील व निधी योगेंद्रसिंग यांनी अनुक्रमे १७ व २१ वर्र्षालील गटात ४०० मीटर्समध्ये ब्राँझपदकाची कमाई केली.
सायंकाळच्या सत्रात झालेल्या या स्पधेर्तील उंच उडीत श्रुतीने दुस-या प्रयत्नात १.६४ मीटर्सपर्यंत उडी मारली. तिने नुकत्याच पंजाबमध्ये झालेल्या शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते तर फेडरेशन चषक स्पर्धेत तिला ब्राँझपदक मिळाल होते. १७ वर्षीय खेळाडू श्रुती ही इचलकरंजी येथे सुभाष माने यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. ती कबनूर कनिष्ठ महाविद्याालयात ११ वी वाणिज्य शाखेत शिकत आहे. येथील विजेतेपदाबाबत तिला आत्मविश्वाास होता.
त्याविषयी ती म्हणाली, शालेय राष्ट्रीय स्पर्धेतील विजेतेपदामुळे माझे मनोधैर्य उंचावले होते. या स्पर्धेतील बरेचसे स्पर्धक खेलो इंडिया स्पर्धेत असल्यामुळे माझ्यासाठी सोपे आव्हान होते. तरीही मी येथील स्पर्धेसाठी चांगली तयारी केली होती. आगामी आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पदक मिळविण्याचे माझे ध्येय आहे.
शर्यतींमध्ये कोल्हापूरची १६ वर्षीय खेळाडू रिया हिने येथे ४०० मीटर्सचे अंतर ५७.८४ सेकंदात पार केले. पायल व्होरा (दिल्ली-५७.०८ सेकंद) व कुंजा रजिता (आंध्रप्रदेश- ५७.६१ सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले. रियाने आतापर्यंत फेडरेशन स्पर्धेत दोन सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले आहे. ती उषाराजे प्रशालेत दहाव्या इयत्तेत शिकत आहे. रघु पाटील, एस.के.म्हसकर व श्री. म्हसकर यांचे तिला मार्गदर्शन मिळत आहे.
ठाण्याची खेळाडू निधी हिला २१ वर्षाखालील गटाची ४०० मीटर्स शर्यत पूर्ण करण्यास ५७.०६ सेकंद वेळ लागला. गतवर्षी तिला खेलो इंडिया स्पर्धेत ब्राँझपदकाने हुलकावणी दिली होती. यंदा तिने जिद्दीने सातत्यपूर्ण वेग ठेवीत तिसरे स्थान घेतले. केरळची ए.एस.सांड्रा (५६.५६ सेकंद) व उत्तरप्रदेशची मनीषा कुशावाह (५६.६५ सेकंद) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले. निधी ही एस.के.सोमय्या महाविद्याालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे. तिला नीलेश पाटकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे.