नवी दिल्ली : भारताचा स्टार आणि अनुभवी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल याला यंदाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला. राष्ट्रपती भवनात ३० नोव्हेंबरला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कमलला गौरविण्यात येईल. त्याचप्रमाणे, भारताचा क्रिकेट कर्णधार रोहित शर्मा आणि अष्टपैलू शार्दूल ठाकूर यांचे शालेय प्रशिक्षक दिनेश लाड यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला.केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या वतीने सोमवारी रात्री क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. २५ खेळाडूंना प्रतिष्ठेचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय यांच्यासह बॉक्सर निकहत झरीन, ॲथलिट एल्डस पॉल, अविनाश साबळे यांचाही समावेश आहे. दिनेश लाड (क्रिकेट, द्रोणाचार्य जीवनगौरव), सुमा शिरूर (दिव्यांग नेमबाजी, द्रोणाचार्य), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स, अर्जुन पुरस्कार), सागर ओव्हळकर (मल्लखांब, अर्जुन पुरस्कार) आणि स्वप्निल पाटील (दिव्यांग जलतरणपटू, अर्जुन पुरस्कार) यांचा समावेश आहे.
यंदाचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न : अचंता शरथ कमल (टेबल टेनिस) अर्जुन पुरस्कार : सीमा पूनिया (ॲथलेटिक्स), एल्डस पॉल (ॲथलेटिक्स), अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एच. एस. प्रणॉय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निकहत जरीन (बॉक्सिंग), भक्ती कुलकर्णी (बुद्धिबळ), आर. प्रज्ञाननंदा (बुद्धिबळ), दीप ग्रेस इक्का (हॉकी), सुशीला देवी (ज्युदो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉनबॉल), सागर ओव्हळकर (मल्लखांब), इलावेनिल वालारिवान (नेमबाजी), ओमप्रकाश मिठारवाल (नेमबाजी), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकुर (भारोत्तोलन), अंशू (कुश्ती), सरिता (कुश्ती), परवीन (वुशू), मानसी जोशी (दिव्यांग बॅडमिंटन), तरुण ढिल्लो (दिव्यांग बॅडमिंटन), स्वप्निल पाटील (दिव्यांग जलतरणपटू), जर्लिन अनिका जे. (बधिर बॅडमिंटन). द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित) : जीवनजोत सिंग तेजा (तिरंदाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा शिरूर (दिव्यांग नेमबाजी) आणि सुजीत मान (कुश्ती). द्रोणाचार्य पुरस्कार (जीवनगौरव) : दिनेश लाड (क्रिकेट), बिमल घोष (फुटबॉल) आणि राज सिंग (कुस्ती). ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार : अश्विनी अकुंजी (ॲथलेटिक्स), धरमवीर सिंह (हॉकी), बी. सी. सुरेश (कबड्डी), नीर बहादुर गुरंग (दिव्यांग ॲथलेटिक्स). राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार : ट्रान्स स्टेडिया इंटरप्रायजेझ प्रायव्हेट लिमिटेड, कलिंगा सूचना प्राैद्योगिकी संस्था, लडाख स्की आणि स्नोबोर्ड संघटना. मौलाना अबुल कलाम आझाद चषक : गुरुनानक देव युनिव्हर्सिटी, अमृतसर.