Kho Kho World Cup 2025 नवी दिल्ली : भारताच्या दोन्ही संघांनी आपापल्या सामन्यात वर्चस्व राखताना पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. महिला संघाने बांगलादेशचा १०९- १६ असा धुव्वा उडवल्यानंतर पुरुषांनी श्रीलंकेचे कडवे आव्हान १००-४० असे परतावले. दोन्ही गटांत उपांत्य सामन्यामध्ये भारताचा सामना शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होईल.
१०० गुणांची कमाई
भारतीय पुरुष संघाने पहिल्यांदाच या स्पर्धेत १०० गुणांची कमाई करताना श्रीलंकेचा सहज फडशा पाडला. कर्णधार प्रतीक वाईकर, सचिन चिंगारी, अनिकेत पोटे आणि रामजी कश्यप यांनी दमदार खेळ करत लंकेला दडपणात ठेवले. मध्यंतराला ५८-१८ अशी आघाडी घेत भारतीयांनी लंकेचे मानसिक खच्चीकरण केले. यानंतर भारताने भक्कम संरक्षण करताना लंकेला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
भारतीय महिलांनी कमालीचा दबदबा राखताना मध्यंतराला ५६-०८ अशी भली मोठी आघाडी घेत बांगलादेशच्या आव्हानातली हवाच काढली. पहिल्या डावात आक्रमणात ५० गुण घेतल्यानंतर महिलांनी संरक्षणातही ड्रीम रनद्वारे ६ गुण मिळवत बांगलादेशच्या जखमेवर मीठ चोळले. यामुळे बांगलादेशला सामन्यात आव्हानच निर्माण करता आले. यानंतर केवळ औपचारिकता राहिलेल्या खेळामध्ये भारताने दुसऱ्या डावातही जबरदस्त आक्रमण करत ५० गुण मिळवले. यानंतर पुन्हा एकदा संरक्षणामध्ये ड्रीम रनद्वारे ३ गुण मिळवत भारतीयांनी दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली.