नवी दिल्ली : यजमान भारताच्या दोन्ही संघांनी शनिवारी शानदार कामगिरी करताना पहिल्या खो-खो विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. प्रथम भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा ६६-१६ असा ५० गुणांनी धुव्वा उडविला. एका बाजूला महिला संघानं एकतर्फी विजय नोंदवला. पण दुसरीकडे पुरुष गटात भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेनं चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला.
भारताला दुहेरी विश्वविजेतेपदासह इतिहास रचण्याची संधी
भारतीय पुरुष संघाला दक्षिण आफ्रिकेने चांगलेच झुंजवले. पण अखेर पाहुण्या संघाटे कडवे आव्हान ६०- ४२ ने परतवून लावण्यात भारतीय पुरुष संघ यशस्वी ठरला. यासह भारतीयांकडे आज ऐतिहासिक दुहेरी विश्वविजेतेपदाची संधी चालून आली आहे.
खो-खो विश्वचषकाच्या महिलांच्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम आक्रमण करताना केवळ १० गुणांची कमाई केली. पुरुष गटाच्या उपांत्य लढतीत भारताला नवख्या दक्षिण आफ्रिकेला हलक्यात घेण्याचे परिणाम भोगावे लागले.सोपा वाटणारा विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला खूप मेहनत घ्यावी लागली. नऊ फळ्या केल्या गारद
झंझावाती खेळ करताना भारताच्या महिला खेळाडूंनी द. आफ्रिकेच्या तब्बल नऊ फळ्या गारद केल्या. दुसरीकडे, द. आफ्रिकेला मात्र दोन्ही डावांमध्ये मिळून भारताच्या केवळ दोन फळ्याच बाद करता आल्या. १० गुणांची ड्रीम रन अभेद्य बचावाचा सर्वांगसुंदर नजराणा पेश करत भारतीय महिलांनी दोन्ही डावांमध्ये ५ गुणांची ड्रीम रन नोंदविली. एकवेळ तर द. आफ्रिकेचा संघ नामोहरम झाला होता.
भारत-नेपाळ यांच्यात रंगणार फायनल
फायनलमध्ये भारत-विरुद्ध नेपाळ अशी रंगत पाहायला मिळणार असून १९ जानेवारी रात्री पुरुष आणि महिला गटातील खो-खो क्रीडा प्रकारातील विश्वविजेता कोण ते फायनल होणार आहे. रात्री ७ वाजून ४५ मिनिटांनी जेतेपदासाठी खो-खो चा थरार सुरु होईल.