सेविले : जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बेल्जियमने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना गतविजेत्या पोर्तुगालला १-० असा धक्का दिला आणि यंदाच्या युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला एका बाजूला घेरण्याची बेल्जियमची चाल यशस्वी ठरली आणि त्यांनी या जोरावर बाजी मारत पोर्तुगालला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. एकीकडे, पोर्तुगालला बेल्जियमचा बचाव भेदण्यात अपयश येत होते. दुसरीकडे बेल्जियमच्या केविन डी ब्रुएन, एडेन हेजार्ड व रोमेलू लुकाकू यांनाही पोर्तुगालचा बचाव भेदता येत नव्हता. थॉर्गन हेजार्ड याने ४२व्या मिनिटाला केलेला गोल निर्णायक ठरला. या गोलच्या जोरावर मिळवलेली आघाडी बेल्जियमने अखेरपर्यंत टिकवत शानदार विजयासह आगेकूच केली. बेल्जियमला आतापर्यंत कोणतीही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही.
बेल्जियमने सांघिक खेळ करताना रोनाल्डोला आपल्या गोलजाळ्यापासून दूर ठेवण्यात यश मिळवले आणि हेच पोर्तुगालला भारी पडले. सामना संपल्यानंतर रोनाल्डो आपली निराशा लपवू शकला नाही आणि त्याने कर्णधाराचा आर्म बँड काढून खाली फेकला. यासह आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल नोंदवण्याच्या विश्वविक्रमापासूनही तो मुकला. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोलसाठी रोनाल्डोला केवळ एका गोलची प्रतीक्षा आहे. आता त्याला या विश्वविक्रमासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागेल.