ऑनलाइन लोकमत
सिडनी , दि. 24 - भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपूट किदाम्बी श्रीकांत सध्या भन्नाट फॉर्ममध्ये असून तो ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सिरिजच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. उपांत्यफेरीतील महत्वाच्या सामन्यात श्रीकांतने चौथ्या सीडेड चीनच्या युकी शी वर 21-10, 21-14 असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणा-या युकी शी सारख्या अव्वल खेळाडूला हरवल्यामुळे श्रीकांतचा आत्मविश्वास नक्कीच उंचावला असणार.
श्रीकांतने सलग तिसऱ्या सुपर सिरिज स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. यापूर्वी त्याने सिंगापूर ओपन आणि इंडोनेशियन ओपनची अंतिम फेरी गाठली होती. मागच्या आठवडयात त्याने इंडोनेशियन ओपनचे जेतेपद पटकावले होते. अशी कामगिरी करणारा तो एकमेव भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आहे. श्रीकांतने सिंगापूर ओपनमध्ये युकीवर विजय मिळवला होता. जोरदार स्मॅश आणि बॅकहॅण्डच्या फटक्याचा अप्रतिम वापर करत श्रीकांतने अवघ्या 40 मिनिटात चीनी प्रतिस्पर्ध्याला लोळवले.
पहिल्या गेमला सुरुवात झाल्यानंतर श्रीकांत आणि युकी दोघे 5-5 असे बरोबरीत होते. पण त्यानंतर श्रीकांतने आपल्या खेळाचा स्तर असा काही उंचावला की, युकीला त्याने पुनरागमनाची संधीच दिली नाही. अवघ्या 15 मिनिटात त्याने पहिला गेम 21-10 असा जिंकला. दुस-या गेमममध्येही दोघे 6-6 असे बरोबरीत होते. पण त्यानंतर श्रीकांतने 11-8 अशी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत आघाडी टिकवून गेमसह सामना जिंकला.
माझी कामगिरी स्वप्नत अशीच होती अशी प्रतिक्रिया श्रीकांतने सामन्यानंतर दिली. दोनवर्षांनंतर मी सिंगापूर ओपनच्या निमित्ताने वर्ल्ड सुपर सिरिजची फायनल खेळलो. त्यानंतर सलग दोन फायनलमध्ये खेळतोय नक्कीच माझ्यासाठी हे स्वप्नवत आहे असे श्रीकांतने सांगितले. युकी विरुद्ध खेळताना माझे संपूर्ण सामन्यावर नियंत्रण होते. मी त्याला सहज पाँईटस मिळू दिले नाही असे श्रीकांतने सांगितले. महिला गटात भारताच्या पी. व्ही. सिंधू व सायना नेहवाल या दोन्ही प्रमुख खेळाडूंना स्पर्धेबाहेर पडावे लागले. यासह महिला एकेरी गटातील भारताचे आव्हान संपुष्टात आले.