मोहाली : खराब फॉर्मचा सामना करीत असलेल्या किंग्स इलेव्हन पंजाबला विजयपथावर येण्यासाठी आयपीएल-१० मध्ये आज शुक्रवारी गतविजेत्या सनरायजर्स हैदराबादविरुद्ध विजय हवा आहे.डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील सनरायजर्सने आठ पैकी चार सामने जिंकले. आरसीबीविरुद्धची लढत पावसात वाहून गेल्याने त्यांना एक गुण मिळाला. हा संघ नऊ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पंजाबचे सात सामन्यांत तीन विजयांसह सहा गुण आहेत. पुढील चारही सामने आमच्यासाठी मोलाचे असतील, असे संघाचे परिचालन प्रमुख वीरेंद्र सेहवागने सांगितले. याआधीच्या सामन्यात हैदराबादने पंजाबला आपल्या मैदानावर पाच धावांनी नमविले होते. मनन वोहराच्या ५० चेंडूतील ९५ धावा पंजाबसाठी उपयोगी ठरल्या नव्हत्या. त्या सामन्यात भुवनेश्वरने हैदराबादसाठी १९ धावांत पाच गडी बाद केले होते. पंजाबच्या जमेची बाजू अशी, की सलामीचा हाशिम अमला जबर फॉर्ममध्ये आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध अमलाने शतक ठोकले होते. कर्णधार ग्लेन मॅक्सवेलनेदेखील आक्रमक खेळी केली. पंजाबकडून स्थानिक क्रिकेट खेळणारे युवराजसिंग आणि सिद्धार्थ कौल हे सनरायजर्ससाठी मोहालीच्या मैदानावर काय चमत्कार करतात, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. (वृत्तसंस्था)
सनरायजर्सविरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाबला हवा विजय
By admin | Published: April 28, 2017 2:05 AM