सचिन कोरडे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाचे खातेवाटप केले. मोदींचे काही निर्णय अपेक्षित ठरले तर काही निर्णयांनी अनेकांना धक्का दिला. त्यातील एक निर्णय ऑलिम्पियन राज्यवर्धन राठोड यांच्या संदर्भातला आहे. राज्यवर्धन राठोड हे गेल्या मंत्रिमंडळात क्रीडा आणि माहिती खात्याचे मंत्री होते. स्वत: क्रीडापटू असल्याने त्यांना क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. पण राठोड यांच्यानंतर आता केंद्रीय क्रीडा मंत्री कोण? असा प्रश्न क्रीडाविश्वाला पडला. याबाबतही मोदींनी धक्कादायक निर्णय घेतला. त्यांनी ४७ वर्षीय किरेन रिजीजू यांना या खात्याची जबाबदारी दिली.
राठोड यांनी ‘खेलो इंडिया’ या मोहिमेलाही मोठे यश मिळवून दिले होते तसेच क्रीडा क्षेत्रासाठी त्यांनी केलेले कामही समाधानकारक होते. असे असताना मोदी यांनी कर्नल राठोडांना दिलेला डच्चू चर्चेचा विषय ठरत आहे. यावर राठोड यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नसून त्यांनी टिष्ट्वटरद्वारे नरेंद्र मोदींना केवळ धन्यवाद दिले आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण बरेच काही शिकलो. गेल्या पाच वर्षांत देशासाठी काहीतरी योगदान दिल्याचे समाधान आहे. मी खात्यांच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे, असे राठोड यांनी यात म्हटले आहे.
रिजीजू हे नॉर्थ ईस्टचा भाजपाचा मोठा चेहरा आहे. ते अरुणाचल मतदारसंघातून पुन्हा निवडून आले आहेत. रिजीजू यांच्याकडे क्रीडा मंत्रालयाचा कारभार देण्याचे एक कारण म्हणजे ते सुद्धा क्रीडा परिवारातून आले आहे. महाविद्यालयात असताना रिजीजू यांनी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व केले होते. शालेय आणि महाविद्यालय स्तरावर त्यांना सर्वाेत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कारही मिळाला आहे. तसेच त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले आहे.