नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांना भारतीय क्रिकेट बोर्ड (बीसीसीआय) यंदा ‘सी. के. नायडू जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करणार आहे. भारतीय संघाचे पहिले कर्णधार कर्नल कोटारी कंकय्या नायडू यांची जन्मशताब्दी बीसीसीआय साजरी करीत असून, त्यानिमित्त मैदानावर आणि मैदानाबाहेर उल्लेखनीय योगदान देणाऱ्या एका व्यक्तीचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार किरमाणी यांना जाहीर झाला असून, पुरस्कार स्वरूपात ट्रॉफी, प्रशस्तिपत्र आणि २५ लाख रुपये रोख दिले जातील. बीसीसीआयच्या मुंबई मुख्यालयात पुरस्कार समितीची बैठक झाली. या समितीत बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर, सचिव अनुराग ठाकूर आणि ‘द हिंदू’चे संपादक एन. राम यांचा समावेश आहे. गावसकर यांनी विंडीजविरुद्ध नाबाद २३६ धावांची खेळी केली, तेव्हा किरमाणी यांनी त्यांच्यासोबत नवव्या गड्यासाठी १४३ धावांची भागीदारी केली होती. क्रिकेटमधील सेवेसाठी भारत सरकारने १९८२मध्ये त्यांचा ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मान केला. किरमाणी हे कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. (वृत्तसंस्था)किरमाणी यांनी १९७६मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी पदार्पण केले. भारताच्या दिग्गज फिरकीविरुद्ध यष्टिरक्षणाचे आव्हान त्यांनी समर्थपणे पेलले. फारूख इंजिनिअर यांच्या उपस्थितीतही किरमाणी हे लवकरच नियमित यष्टिरक्षक बनले. एक दशक ही भूमिका पार पाडताना त्यांनी तळाच्या स्थानावर फलंदाजी करून २ शतकांची नोंदही केली आहे. १९८१-८२च्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांनी एकही बाय धाव दिली नव्हती. १९८३च्या विश्वचषकात ते ‘सर्वोत्कृष्ट यष्टिरक्षक’ ठरले होते.झिम्बाब्वेविरुद्ध १२६ धावांनी महत्त्वाची भागीदारी करणारे किरमाणी हेच होते. कर्णधार कपिल देव यांनी त्या वेळी १७५ धावा ठोकून भारताला विजय मिळवून दिला होता.
किरमाणी यांना ‘सी. के. नायडू जीवन गौरव’ पुरस्कार
By admin | Published: December 24, 2015 11:48 PM