हॅमिल्टन : न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटी सामन्यात रविवारी तिसऱ्या दिवशी श्रीलंकेचा दुसरा डाव १३३ धावांत गुंडाळल्यानंतर विजयासाठी आवश्यक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केन विलियम्सनच्या चमकदार खेळीच्या जोरावर दिवसअखेर ५ बाद १४२ धावांची मजल मारली. मालिकेत श्रीलंकेला क्लीन स्विप देण्यासाठी यजमान न्यूझीलंडला केवळ ४७ धावांची गरज आहे. तिसऱ्या दिवशी उपाहाराला खेळ थांबला, त्या वेळी न्यूझीलंडची विजयाची आशा धूसर झाली होती. त्या वेळी श्रीलंका संघाने १२६ धावांची आघाडी घेतली होती आणि दुसऱ्या डावात त्यांच्या सर्व विकेट शिल्लक होत्या. त्यानंतर मात्र पाहुण्या संघाने ६२ धावांच्या मोबदल्यात सर्व १० विकेट गमावल्या. पहिल्या डावात ५५ धावांनी पिछाडीवर पडलेल्या न्यूझीलंड संघापुढे विजयासाठी १८९ धावांचे लक्ष्य होते. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला, त्या वेळी ७८ धावा खेळून नाबाद असलेल्या केन विलियम्सनला बी.जे. वाटलिंग खाते न उघडता साथ देत होता. श्रीलंका संघाच्या आशा वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरावर केंद्रित झाल्या आहे. त्याने आतापर्यंत दुसऱ्या डावात ४५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले आहेत. चमीराने या लढतीत आतापर्यंत ९ बळी घेतले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. दोन्ही सलामीवीर टॉम लॅथम व मार्टिन गुप्तिल तंबूत परतले त्या वेळी धावफलकावर केवळ ११ धावांची नोंद होती. त्यानंतर विलियम्सनने रॉस टेलरच्या (३५) साथीने तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. ही भागीदारी संपुष्टात आल्यानंतर विलियम्सनने कर्णधार ब्रॅन्डन मॅक्युलमसोबत (१८) चौथ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली. मिशेल सेन्टनर (४) याला मोठी खेळी करता आली नाही. त्याआधी कालच्या ९ बाद २३२ धावसंख्येवरून पुढे खेळताना न्यूझीलंडचा दुसरा डाव २३७ धावांत संपुष्टात आला. श्रीलंका संघाला कुशाल मेंडिस (४६) व दिमुथ करुणारत्ने (२७) यांनी सलामीला ७१ धावांची भागीदारी करीत चांगली सुरुवात करून दिली. श्रीलंका संघातर्फे वर्षभरात सलामीला ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. डग ब्रेसवेलने करुणारत्नेला बाद करीत न्यूझीलंडला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर न्यूझीलंड संघाचा श्रीलंकेचा डाव गुंडाळण्यास फार वेळ लागला नाही. ब्रेसवेलने दोन चेंडूंनंतर उदारा जयसुंदरा (०) याला माघारी परतवले, तर नील वेगनरने दिनेश चांदीमल (४) याला बाद करीत श्रीलंकेची ३ बाद ७७ अशी अवस्था केली. मेंडिसने कारकिर्दीतील सर्वोत्तम ४६ धावांची बरोबरी केल्यानंतर टीम साऊदीच्या गोलंदाजीवर सेन्टनरकडे झेल देत तंबूची वाट धरली. साऊदीने त्यानंतर अँजेलो मॅथ्यूज, रंगना हेराथ आणि प्रदीप यांना बाद केले. सलामीच्या फलंदाजांव्यतिरिक्त केवळ मिलिंदा सिरिवर्दने (२६) दुहेरी धावसंख्या नोंदवण्यात यशस्वी ठरला. साऊदीने २६ धावांच्या मोबदल्यात ४, तर वेगनरने ४० धावांत ३ बळी घेतले. ब्रेसवेलने ३१ धावांत २ फलंदाजांना तंबूचा मार्ग दाखवला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : श्रीलंका पहिला डाव २९२. न्यूझीलंड पहिला डाव २३७.श्रीलंका दुसरा डाव :- करुणारत्ने झे. साऊदी गो. ब्रेसवेल २७, मेंडिस झे. सेन्टनर गो. साऊदी ४६, चंदीमल झे. गुप्तिल गो. वॅगनर ०४, मॅथ्यूज झे. वाटलिंग गो. साऊदी ०२, सिरिवर्दना झे. बोल्ट गो. वॅगनर २६, विथांगे झे. ब्रेसवेल गो. वॅगनर ०९, अवांतर (१६). एकूण ३६.३ षटकांत सर्व बाद १३३. गोलंदाजी : बोल्ट ७-१-३०-०, साऊदी १२.३-२-२६-४, ब्रेसवेल ८-१-३१-२, वॅगनर ९-२-४०-३. न्यूझीलंड दुसरा डाव : लॅथम झे. प्रदीप गो. चमिरा ०४, गुप्तिल झे. करुणारत्ने गो. चमिरा ०१, विलियम्सन खेळत आहे ७८, टेलर झे. वंदेरसे गो. चमिरा ३५, मॅक्युलम झे. मॅथ्यूज गो. चमिरा १८, सेन्टनर झे. चंदीमल गो. लकमल ०४, वॉटलिंग खेळत आहे ००. अवांतर (२). एकूण ४२ षटकांत ५ बाद १४२. गोलंदाजी : चमिरा १३-१-४५-४, लकमल १०-३-१९-१, हेराथ ९-०-३९-०, प्रदीप ९-१-३५-०, मॅथ्यूज १-०-४-०.
किवींना ‘क्लीन स्विप’ची संधी
By admin | Published: December 20, 2015 11:57 PM