- सौरभ गांगुली लिहितो...कोलकाता नाईट रायडर्सला तीन दिवसांत दोन महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. आज शुक्रवारी गुजरात लायन्सविरुद्ध सामना खेळल्यानंतर केकेआरची रविवारी गाठ पडेल ती बेंगळुरू रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध. सध्या केकेआर विजयी घोडदौड करीत आहे. पण आयपीएलचा हा सुरुवातीचा टप्पा आहे, हे ध्यानात घ्यावे लागेल. परिस्थिती झटपट बदलू शकते. दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यातील कामगिरीमुळे केकेआर संघ सुखावला. मोठ्या स्पर्धेत खेळताना कुठल्याही संघाला सुरुवातीचे धक्के बसणे स्वाभाविक आहे. पण त्यावर तोडगा काढणे महत्त्वाचे ठरते. केकेआरने सुरुवातीला तीन षटकांत तीन गडी गमावल्यानंतरही परिस्थितीवर विजय मिळविण्यात यश संपादन केले. संघाच्या यशासाठी वेगवेगळ्या खेळाडूंनी योगदान देणेही तितकेच महत्त्वाचे. युसूफ पठाणच्या त्या दिवशीच्या खेळीने संघ व्यवस्थापनाचा आत्मविश्वास परतला. ख्रिस लीनच्या दुखापतीनंतर आपण खंदा फलंदाज गमावल्याच्या वेदना व्यवस्थापनाला होत असाव्यात. पण गरज असताना मनीष पांडे आणि पठाण यांनी दमदार खेळी करीत उणीव भरून काढली. मनीष हा फारच उपयुक्त खेळाडू आहे. तो आपल्या संघात असायला हवा, असे प्रत्येक संघाला वाटत असावे. पुढील दोन सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात आज गुजरात लायन्सशी गाठ आहे. या लढतीत केकेआर निश्चितपणे विजयाचा दावेदार वाटतो. गुजरातची फलंदाजी-गोलंदाजी अडखळल्यासारखी दिसत आहे. दुसरीकडे केकेआरचे फिरकी गोलंदाज त्यांच्या तुलनेत वरचढ ठरले. सुनील नारायण, कुलदीप यादव, पीयूष चावला यांचा मारा कुठल्याही खेळपट्टीवर भेदक ठरत असल्याने १६० किंवा १८० धावांचा पाठलाग करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघांच्या ‘नाकीनऊ’ आणण्याचे कसब त्यांच्या माऱ्यात आहे. गुजरात संघाला यश मिळवायचे झाल्यास त्यांचे फिरकी गोलंदाज लवकर फॉर्ममध्ये येणे गरजेचे आहे. स्पर्धेत टिकून राहण्याची हीच वेळ आहे; अन्यथा वेळ निघून गेल्याने बाहेर पडण्याची स्थिती उत्पन्न होऊ शकते. ख्रिस गेलला संधी देत आरसीबीने शहाणपणा दाखविला. पुनरागमनासोबतच गेलला सूर गवसला, हे विशेष. याआधीही गेलने संघासाठी यशस्वी कामगिरी केली असल्याने मोक्याच्या क्षणी गेलकडून अशीच कामगिरी होत राहावी, अशी मनोमन इच्छा कर्णधार कोहलीनेदेखील बाळगली असावी. केकेआरला आरसीबीकडून मोठे आव्हान मिळेल, यात शंका नाही. पण सध्याचा केकेआरचा फॉर्म पाहता माझ्या मते दोन्ही सामन्यांत केकेआरचीच सरशी होईल, असे दिसते. (गेमप्लान)
पुढील लढतींमध्ये केकेआरच ‘फेव्हरिट’!
By admin | Published: April 21, 2017 1:56 AM