मोहाली : गेल्या लढतीत शानदार विजयासह आयपीएलच्या ‘प्ले आॅफ’मध्ये स्थान निश्चित करणारा कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघ मंगळवारी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा पराभव करीत अव्वल दोन संघांमध्ये स्थान मिळविण्यास उत्सुक आहे. सलग दोन सामने गमाविणाऱ्या केकेआर संघाने रविवारी बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाचा ६ गडी राखून पराभव केला. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघ आतापर्यंत १२ सामन्यांत १६ गुणांची कमाई करीत दुसऱ्या स्थानावर आहे. आता किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा पराभव करीत आपली बाजू अधिक बळकट करण्याचा केकेआर संघाचा निर्धार आहे. पंजाब संघाला रविवारी गुजरात लायन्स संघाने ६ गडी राखून पराभूत केले. केकेआरने आयपीएलमध्ये सर्वांत मजबूत संघ असल्याचे रविवारी सिद्ध केले. विजयासाठी १५९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरने ६ षटकांत गडी न गमावता १०५ धावांची मजल मारली होती. आयपीएलमध्ये हा नवा विक्रम आहे. केकेआरने २९ चेंडू शिल्लक राखून लक्ष्य गाठले. सुनील नरेनने १७ चेंडूंमध्ये ५४ धावा फटकावल्या. त्याने १५ चेंडूंमध्ये आयपीएलमध्ये सर्वांत वेगवान अर्धशतकाचा विक्रम संयुक्तपणे आपल्या नावावर केला. सामन्यानंतर प्रतिक्रिया देताना गंभीर म्हणाला, सहा षटकांत १०५ धावा, यावर विश्वासच बसत नाही. मी माझ्या कारकिर्दीत अशी भागीदारी बघितली नाही. केकेआर संघाला मात्र आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. नरेन फॉर्मात असल्यानंतर गंभीर व रॉबिन उथप्पा यांनी चांगल्या सुरुवातीचा लाभ घेतला आहे. याव्यतिरिक्त उर्वरित फलंदाजांनाही योगदान द्यावे लागेल. नरेनने केकेआरतर्फे १२ पैकी ९ सामन्यांत डावाची सुरुवात करताना आतापर्यंत १९४ धावा फटकावल्या आहेत. केकेआर संघाला कोलिन डे ग्रांडहोमे, मनीष पांडे व युसूफ पठाण या फलंदाजांकडूनही चमकदार खेळीची अपेक्षा आहे. उमेश यादव, ख्रिस व्होक्स व नरेन यांच्यावर गोलंदाजीचा भार राहिला. त्यांना अंकित राजपूत व पीयूष चावला यांच्याकडून योग्य साथ लाभेल, अशी आशा आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता मॅक्सवेलच्या नेतृत्वाखालील पंजाब संघाला ११ पैकी केवळ ५ सामन्यांत विजय मिळवता आला. १० गुणांसह हा संघ तालिकेत पाचव्या स्थानी आहे. बाद फेरी गाठण्याची आशा कायम राखण्यासाठी त्यांना उर्वरित तिन्ही सामन्यांत विजय मिळवावा लागेल. हाशिम अमलाच्या शतकी खेळीच्या जोरावर ३ बाद १८९ धावांची मजल मारल्यानंतरही पंजाब संघाला पराभव स्वीकारावा लागला. गुजरात संघातर्फे ड्वेन स्मिथने ३९ चेंडूंमध्ये ७४ धावांची खेळी केली केली. पंजाब संघाच्या क्षेत्ररक्षकांनी त्याला दोनदा जीवदान दिले. अमला व मॅक्सवेल यांच्याव्यतिरिक्त पंजाब संघाला मार्टिन गुप्टील, शॉन मार्श, मनन व्होरा, रिद्धिमान साहा व अक्षर पटेल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.