ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 16 - विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असला तरी, माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या अनुभवचाही संघाला प्रचंड फायदा होत आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बांगलादेश विरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात महत्वाची भूमिका बजावणा-या केदार जाधवने धोनीची आपल्याला भरपूर मदत होत असल्याचे मान्य केले.
मी जास्त गोलंदाजीचा सराव करत नाही पण एमएस धोनीसोबत राहून शक्य तितके त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करतो. धोनीने त्याच्याकडे जो अनुभव, ज्ञान आहे ते त्याने मला दिले. गोलंदाजी करतानाही यष्टीपाठून धोनी मला सतत मार्गदर्शन करत असतो. कुठल्या फलंदाजाला कशी गोलंदाजी करावी हे तो मला सांगत असतो. मी सुद्धा त्याच्या सल्ल्यानुसार गोलंदाजी करतो असे केदारने सांगितले. गोलंदाजी करताना धोनींच्या डोळयांकडे पाहिल्यानंतर माझ्याकडून कुठला चेंडू त्याला अपेक्षित आहे ते लक्षात येते असे केदारने सांगितले.
जाधव स्वत:ला काम चलाऊ गोलंदाज समजत नाही. आपल्याकडे गोलंदाजीत वैविध्य असून यापूर्वीच्या मालिकेतही मी गोलंदाजी केलीय. मी वरच्या फळीतील फलंदाजांना बाद केलेय असे जाधवने सांगितले. कालच्या सामन्यात विराटने केदारच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर त्याने कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
केदारने तमीम इक्बाल (71) आणि मुशाफीकूर रहिमची (61) जमलेली जोडी फोडली. त्यामुळे भारताला सामन्यावर पकड मिळवता आली. हार्दिक पंडयाला मार बसल्यानंतर विराटने केदारच्या हाती चेंडू सोपवला. केदारने सहा षटकात 22 धावा देत दोन गडी बाद केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत मोठ्या दिमाखात अंतिम फेरी गाठली. बांगलादेशने दिलेले २६५ धावांचे आव्हान टीम इंडियाने ४०.१ षटकांत ९ गडी राखून पूर्ण केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो शतकवीर रोहित शर्मा. त्याने १२९ चेंडूत १२३ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला कर्णधार विराट कोहली (९६) आणि सलामीवीर शिखर धवन (४६) यांनी दमदार साथ दिली. तत्पूर्वी अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याने घेतलेल्या दोन बळींच्या जोरावर भारताने बांगलादेशला २६४ धावात गुंडाळले.
बांगलादेशचा सलामीवीर तमीम इक्बाल आणि मुशीफिकूर रहीम यांनी शतकी भागीदारी करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. त्या वेळी कर्णधाराने चेंडू केदारकडे सोपवला. कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत केदारने तमीम इक्बालला त्रिफळाचीत केले. त्यानंतर प्रमुख गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली.