नशीब हा खेळातील महत्वाचा भाग... आयपीएलमधील उलाढालीने अनेकांचे नशीब बदलले...पण आयपीएलचे शिल्पकार ललित मोदी यांच्या बाबतीत नशीबाची चक्र उलटी फिरली. आयपीएलमध्ये संघाची संख्या वाढवण्याची घोषणा झाली. कोच्ची टस्कर व पुणे वॉरियर हे नवे संघ आयपीएलमध्ये दाखल झाले. पण कोच्ची टक्सर फ्रेंचायझीच्या समभागधारकांची (हिस्सेदार) नावे ललित मोदींनी जगजाहीर केली व नवा वाद निर्माण झाला.
कोच्ची टस्कर्स हा संघ रांदेवू स्पोर्ट्स वर्ल्डने खरेदी केला होता. या फ्रेंचायझीच्या भागधारकांमध्ये सुनंदा पुष्कर यांचा समावेश होता. सुनंदा पुष्कर या त्यावेळी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांच्या निकटवर्तीय होत्या. कोच्ची टस्करचे मालक व भागधारकांची नावे जाहीर करु नये यासाठी माझ्यावर दबाव होता असे ललित मोदींनी जाहीर केले. सुनंदा पुष्कर यांची शिफारस एका मंत्र्याने केल्याची चर्चा रंगू लागली. यामुळे मैदानात खेळण्यापूर्वीच कोच्ची टस्कर्स हा संघ चर्चेचा विषय बनला. कोच्ची संघाच्या मालकीतील संशयास्पद व्यवहारांमुळे सुनंदा पुष्कर व शशी थरुर दोघेही गोत्यात आले. तर बीसीसीआयने आयपीएलचे तिसरे पर्व संपताच ललित मोदींची उचलबांगडी केली. यानंतर ललित मोदी परदेशात निघून गेले. तर नियमांचे उल्लंघन केल्याने कोच्ची टस्कर्स हा संघही आयपीएलमधून बाद झाला.
पुणे वॉरियर्स हा संघही वादाच्या भोव-यात सापडला. संघाची मालकी असलेला सहारा समुह व बीसीसीआय यांच्यात वादाचे खटके उडाले. अखेरीस पुणे वॉरियर्सचेही आयपीएलमधून पॅक अप झाले.