मेलबोर्न : भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम वन-डे फलंदाज आहे, पण त्याला कसोटी क्रिकेटमध्ये आताच महान म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगने व्यक्त केली. पॉन्टिंग म्हणाला, ‘विराटने फलंदाजीमध्ये नवे मापदंड तयार केले आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे.’कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांना कसोटी मालिकेत पराभूत केले आहे. कोहली आता वन-डे संघाचाही कर्णधार आहे. पॉन्टिंग म्हणाला, तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून कोहलीची कामगिरी आणखी बहरेल. आताच त्याला सर्वोत्तम म्हणणे घाईचे ठरले. वन-डे क्रिकेटमध्ये तो सर्वोत्तम आहे. त्याची वन-डेतील कामगिरी उल्लेखनीय आहे, पण कसोटीमध्ये त्याला आणखी थोडा वेळ द्यावा लागेल. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आताच महान म्हणता येणार नाही. महान खेळाडू तेंडुलकर, लारा, कॅलिस यांच्यासारखे असतात. भारतात खेळताना यजमान संघाला सूर गवसू नये, यासाठी प्रयत्नशील असायला हवे, असेही पॉन्टिंग म्हणाला. आॅस्ट्रेलिया संघाला भारतावर वर्चस्व गाजविण्यासाठी कोहलीला रोखणे आवश्यक आहे. विराटबाबत एक गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यावर दडपण असले म्हणजे तो कम्फर्ट झोनच्या बाहेर जातो. तो आक्रमक होतो आणि ही बाब त्याच्यासाठी आणि प्रतिस्पर्धी संघासाठी लाभदायक ठरू शकते.- रिकी पॉन्टिंग भारतात यष्टिरक्षणाचे तंत्र महत्त्वाचे ठरेल : हॅडिनभारतात कसोटी क्रिकेट खेळणे नेहमीच खडतर असते आणि यष्टिरक्षण करताना यश मिळण्यासाठी तुम्हाला तुमच्या तंत्रावर विश्वास असणे आवश्यक असते, असे मत आॅस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक बॅ्रड हॅडिनने म्हटले आहे. आॅस्ट्रेलिया संघ २३ फेब्रुवारीपासून भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. आॅस्ट्रेलियाचा यष्टिरक्षक मॅथ्यू वेड दुखापतीतून सावरत आहे. वेडला मार्गदर्शन करण्याच्या प्रश्नावर बोलताना हॅडिन म्हणाला, ‘तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणणे आवश्यक आहे. कुठलाही झेल टिपणे आवश्यक आहे. भारताचा दौरा खडतर असतो. होबार्ट कसोटीनंतर स्वत:च्या कामगिरीची चाचणी घेण्याची चांगली संधी आहे. वेडसाठी आपल्या तंत्रावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.’हॅडिन पुढे म्हणाला, ‘भारतात यष्टिरक्षकावर दडपण असते, अशा वेळी तंत्र अचूक असणे आवश्यक असते.’दरम्यान, आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेमियन फ्लेमिंगने म्हटले आहे, की भारत दौरा स्टीव्ह स्मिथसाठी कडवे आव्हान राहील. वॉर्नर उपकर्णधार असून तो मिडफिल्डमध्ये राहील. स्लिपमध्ये कोण असेल. यष्टिरक्षकाची भूमिका महत्त्वाची राहील आणि त्याचा सल्ला घेता येईल. अॅलिस्टर कुकने ३२ व्या वर्षी थकव्यामुळे कर्णधारपदाचा त्याग केला. स्मिथ केवळ २७ वर्षांचा आहे, पण ३३ व्या वर्षी कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकणार नाही.’ भारतात मोठी धावसंख्या उभारणे आव्हानात्मक : लीमनभारतात २० बळी घेण्याबाबत आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लीमन यांना साशंकता नाही, पण आमच्या फलंदाजांसाठी मोठी धावसंख्या उभारणे आव्हानात्मक ठरणार आहे. यापूर्वी मॅथ्यू हेडन आणि डेमियन मार्टिन यांनी जशी कामगिरी केली तशी कामगिरी कुणीतरी करणे आवश्यक आहे, असेही लीमन म्हणाले. आॅस्ट्रेलिया संघ २३ फेबु्रवारीपासून भारतात चार कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. लीमन म्हणाले, ‘मालिकेसाठी योग्य रणनीती ठरवणे आवश्यक असून कुठलीही चूक करता येणार नाही. प्रत्येक झेल टिपणे आवश्यक असून दडपण निर्माण करणे गरजेचे आहे. इंग्लंडने चांगला खेळ केला, पण तरी त्यांना ४-० ने पराभव स्वीकारावा लागला. आम्हाला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. आमच्या संघात २० बळी घेण्याची क्षमता असलेले फिरकीपटू आहेत. रिव्हर्स स्विंग करण्यास सक्षम असलेले वेगवान गोलंदाज आहेत. आम्हाला २० बळी घेण्याची चिंता नाही, पण मोठी धावसंख्या उभारणे गरजेचे आहे.’
डेमियन मार्टिनच्या दोन शतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने २००४ च्या दौऱ्यात भारताचा २-१ ने पराभव केला होता. यापूर्वी मॅथ्यू हेडनने २००१ मध्ये मालिकेत ५४९ धावा फटकावल्या होत्या. त्यावेळी आॅस्ट्रेलियाला २-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता. लीमन म्हणाला, ‘आॅस्ट्रेलिया संघातील सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे आमचे खेळाडू दडपणाखाली चांगली कामगिरी करतात. एखादा खेळाडू या मालिकेत हेडन किंवा मार्टिनप्रमाणे चांगली कामगिरी करेल, अशी आशा आहे, असे घडले तर आम्हाला मोठी धावसंख्या उभारता येईल.’ लीमन म्हणाले, ‘भारत दौऱ्याच्या तयारीसाठी आमचा संघ भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचे व्हिडीओ विश्लेषण करीत आहे. आम्हाला पाचही दिवस आक्रमक क्रिकेट खेळावे लागले. कुठलाही विदेश दौरा खडतर असतो. उपखंडातील दौरे आमच्यासाठी नेहमीच कठीण असतात.’भारतीय कर्णधार विराट कोहलीला कसे बाद करणार, याबाबत बोलताना लीमन म्हणाले, ‘चांगली गोलंदाजी केल्यानंतर नशिबाची साथ लाभेल, अशी आशा आहे. तो चांगला खेळाडू असून त्याच्याविरुद्ध रणनीती तयार करावी लागेल.’