ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 23 - माजी भारतीय ऑफ स्पिनर ईरापल्ली प्रसन्ना यांनी विराट कोहलीवर टीका करत, जर कर्णधाराला आपण भारतीय क्रिकेटचा बॉस आहे असं वाटत असेल, तर मग संघाला प्रशिक्षकाची काय गरज ? असा सवाल विचारला आहे. प्रसन्ना यांना जेव्हा विराट कोहली आणि भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणा-या अनिल कुंबळेबाबत विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी कडक शब्दात टीका केली. "कर्णधारच बॉस आहे तर मग त्यांनी प्रशिक्षकाची काय गरज ? मला तर वाटतं त्यांना बॅटिंग आणि फिल्डिंग कोचची देखील गरज नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना बोलले आहेत.
प्रसन्ना यांनी यावेळी विराट कोहलीच्या कर्णधार क्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. "कोहली एक चांगला खेळाडू आहे यात काही वाद नाही. मात्र तो एक चांगला कर्णधार आहे की नाही याबद्दल काही बोलू शकत नाही", असं ईरापल्ली प्रसन्ना यांनी सांगितलं. आयसीसी चॅम्पिअन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर अनिल कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. कोहलीला आपली शिकवण्याची पद्धत आवडत नसल्याचा उल्लेख त्यांनी राजीनामा दिल्यानंतर ट्विटरवर केला होता. भारतीय संघ प्रशिक्षकाविनाच वेस्ट इंडिज दौ-यावर गेला आहे. तिथे पाच एकदिवसीय आणि एक टी-20 सामना खेळायचा आहे.
प्रसन्ना यांनी सांगितलं की, "जर कुंबळेसारख्या वरिष्ठ खेळाडूला सन्माननीय वागणूक मिळत नसेल, तर मग मला नाही वाटत की बांगड किंवा श्रीधर यांच्यात इतकी ताकद आहे की ते कोहलीसोबत आत्मविश्वासने संवाद साधतील. यामधील कोणीही कुंबळेइतकं अनुभवी नाही". ते म्हणालेत की, "जर कर्णधाराचं वागणं असंच राहणार असेल, तर कोचची गरज आहे असं मला वाटत नाही".
प्रसन्ना बोलले आहेत की, "जर कोहलीने जबाबदारी घेतली तर पुन्हा एकदा जुने दिवस येतील जेव्हा सर्व गोष्टींची जबाबदारी घेण्यासाठी मॅनेजरची नियुक्ती केली जायची. कोचची नेमकी भूमिका स्पष्ट नाही करण्यात आली आहे". प्रसन्ना यांनी पुढे बोलताना सांगितलं की, "युवराज सिंह आणि महेंद्रसिंग धोनीबद्दल विचार करण्याची वेळ आली आहे. मला नाही वाटत की 2019 मध्ये होणा-या वर्ल्डकपपर्यंत आपला खेळ कायम ठेवण्यात त्यांना यश मिळेल. तोपर्यंत दोघेही 38 वर्षांचे होतील. आपल्याला नवीन आणि तरुण खेळाडूंची गरज आहे, जे चपळ असतील".
प्रसन्ना पुढे बोललेत की, "धोनी विके़टकीपर असेल, मात्र युवराज सिंह एक खेळाडू म्हणून ओझं बनत चालला आहे. वेस्ट इंडिज दौ-यात समोर दुबळा संघ असताना तरुण खेळाडूंची निवड करायला हवं होतं".