ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 14 - ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसननं भारतीय कर्णधार विराट कोहलीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. विराट कोहलीचे नेतृत्व गुण वाखाणण्याजोगे असून, तो एक हुकूमशाह कर्णधार असल्याचंही वॉटसन म्हणाला आहे. द डेली टेलिग्राफ या वृत्तपत्राला वॉटसननं मुलाखत दिली होती. त्यात त्यानं कोहलीवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. येत्या आयपीएलमध्ये शेन वॉटसन विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळण्याची शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर वॉटसननं कोहलीचं कौतुक केल्याची क्रिकेट वर्तुळात चर्चा आहे. तो म्हणाला, कोहलीसारखे खेळण्याचा प्रयत्न प्रत्येक ऑस्ट्रेलियन खेळाडूनं केला पाहिजे. कोणताही सामना असो, कोहलीला तो जिंकण्याचे वेड आहे, सामना गमावणे त्याला आवडत नाही. कोहलीमध्ये सहनशीलता नाही, असं म्हणणं योग्य ठरणार नाही. उलट कोहलीची मैदानावरची सकारात्मक खिलाडू वृत्ती प्रत्येकानं आत्मसाद करण्याची गरज आहे. सामना जिंकण्यासाठी त्याची तळमळ मला नेहमीच भारावून टाकते, असे वॉटसन म्हणाला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान रांची येथे येत्या गुरुवारपासून तिसरा कसोटी सामना खेळविला जाणार आहे. मालिकेत आघाडी मिळवण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा सामना महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बंगळुरू कसोटीतल्या डीआरएस वादावरही वॉटसननं सावध प्रतिक्रिया दिली आहे. बंगळुरू कसोटीतील कोहली आणि स्मिथच्या वादाच्या प्रकरणापेक्षाही त्या दोघांना मी खूप जवळून ओळखतो. कोहली जिंकण्याच्या तळमळीने खेळतो, तर स्मिथचीही वृत्ती खिलाडू आहे. स्मिथ आणि कोहली हे दोघेही एकमेकांना पूरक आहेत. दोघंही सर्वोत्तम खेळाडू असून, मैदानावर ते जिंकण्याच्या उद्देशानेच उतरतात. जगातील दोन सर्वोत्तम फलंदाज आणि कर्णधारांमध्ये चुरशीची लढत होत असताना पाहणे हे माझ्यासारख्या क्रिकेटप्रेमींचं भाग्यच म्हणायचं, असं म्हणत वॉटसन दोन्ही बाजू सांभाळून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
कोहली हुकूमशाह कर्णधार - शेन वॉटसन
By admin | Published: March 14, 2017 7:16 PM