कोलकाता : भारतीय कर्णधार महेंद्रसिंह धोनीने टी-२० विश्वकप स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत चमकदार फलंदाजी करणाऱ्या विराट कोहलीची प्रशंसा केली. आव्हानांना सामोरे जाण्याच्या क्षमतेमुळे हा शैलीदार फलंदाज अन्य फलंदाजांच्या तुलनेत वेगळा आहे, अशा शब्दांत धोनीने विराटची प्रशंसा केली.ईडन गार्डनवर शनिवारी रात्री खेळल्या गेलेल्या कमी धावसंख्येच्या लढतीत कोहलीने ३७ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ५५ धावांची खेळी केली आणि भारताला ६ गडी राखून विजय मिळवून देताना महत्त्वाची भूमिका बजावली. पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या या लढतीत भारताने ११९ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना धोनी म्हणाला,‘‘चांगली कामगिरी करण्याची भूक, आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता, यामुळे विराट अन्य खेळाडूंच्या तुलनेत वेगळा आहे. प्रत्येक बाब आव्हान म्हणून स्वीकारण्याची तयारी, ही त्याची खासियत आहे. प्रत्येक सामन्यात योगदान देण्यासाठी तो सज्ज असतो. फिटनेस राखण्यावर त्याचा विशेष भर असतो. धावा फटकावण्यासाठी वेगवेगळ्या खेळपट्ट्यांवर कशी फलंदाजी करायची, याची त्याला चांगली कल्पना आहे. त्याला सूर गवसला, तर तो मोठी खेळी करतो. खेळताना धावा फटकावण्यावर भर देणे आवश्यक असते. खेळाडूला कारकिर्दीत कधी तरी वाईट कालखंडाला सामोरे जावे लागते.
कोहली इतरांपेक्षा वेगळा : धोनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2016 2:31 AM