लंडन : अपयशातून मार्ग काढण्यासाठी प्रत्येक कर्णधारांची वेगवेगळी पद्धत असते. विराट कोहलीचे सोपे सूत्र आहे. प्रामाणिक राहा आणि सहकारी खेळाडूंच्या हृदयावर आघात होईल, अशा काही बाबी बोला. श्रीलंकेविरुद्धचा पराभव कोहलीसाठी मोठा धक्का होता, त्यानंतर संघाला आत्ममंथन करण्याची गरज भासली. कोहली म्हणाला, ‘तुम्ही स्वत: प्रामाणिक असायला हवे; सहकारी खेळाडूंच्या हृदयावर आघात होईल, असे काहीतरी वक्तव्य करायला हवे. माझ्या मते तेच योग्य आहे. चूक कुठे झाली, हे खेळाडूंना सांगायला हवे. त्यापासून बोध घेत मैदानात उतरावे लागेल. त्यासाठी लाखो व्यक्तींमधून या पातळीवर खेळण्यासाठी आपली निवड झाली आहे.’ गत चॅम्पियन भारताने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळाच्या प्रत्येक विभागात वर्चस्व गाजवले. आता उपांत्य फेरीत भारताची गाठ बांगलादेशसोबत पडणार आहे. भारतीय कर्णधार म्हणाला, ‘अपयशानंतर दमदार पुनरागमन करण्याची कला असणे आवश्यक आहे. तुम्ही वारंवार चुकीची पुनरावृत्ती करू शकत नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयाचे श्रेय सांघिक कामगिरीला जाते.’ कर्णधारपद सांभाळताना प्रामाणिकपणे संघाचे आकलन करणे आवश्यक असते, असेही कोहलीने सांगितले. कोहली म्हणाला, ‘खेळाडूला त्याची चूक लक्षात आणून देताना त्याला वारंवार त्याबाबत बोलणे चुकीचे आहे. कारण मी या सर्वांसोबत बराच खेळलो आहे. त्यांच्यासोबत कसे बोलायचे आणि कुठली चर्चा करायची, याचे ज्ञान असायला हवे.’ कोहली पुढे म्हणाला, ‘या पातळीवर खेळण्यासाठी आणि चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित आहे. छोट्या-छोट्या बाबींवर समर्थन मिळणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)