ऑनलाइन लोकमत
बंगळुरु, दि.13 - प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्सविरुद्ध उद्या शुक्रवारी आयपीएल-१० मध्ये घरच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्ध रांचीतील तिस-या कसोटीत क्षेत्ररक्षणादरम्यान कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. तेव्हापासून तो बाहेर होता. बीसीसीआयच्या वैद्यकीय चमूने त्याला फिट घोषित करताच आरसीबीचा आत्मविश्वास उंचावला. हा संघ तीन पैकी दोन सामने हरला आहे. कोहलीने काल सराव सत्रात नेटमध्ये चांगलाच घाम गाळला. मागच्यावर्षी त्याने १६ सामन्यात चार शतकांसह ९७३ धावा केल्या. अंतिम सामन्यात मात्र आरसीबीला सनराइजर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला. दहाव्या सत्रात आरसीबी सध्या सहाव्या स्थानावर आहे. कोहलीच्या गैरहजेरीत डिव्हिलियर्सने ४६ चेंडूत नाबाद ८९ धावा ठोकल्या पण अन्य सहकाºयांची त्याला साथ न लाभल्याने पंजाबविरुद्ध सामना गमवावा लागला होता. ख्रिस गेल याचा फॉर्म देखील संघाच्या चिंतेत वाढ करणारा आहे. गेल्या दहा डावात त्याचे एकही अर्धशतक नाही. लोकेश राहुल जखमी असल्याने यंदा खेळणार नाही. सर्फराज खान हा पहिल्या सामन्याआधीच्या सरावादरम्यान जखमी झाला. केदार जाधवने दिल्लीविरुद्ध ३७ चेंडूत ६९ आणि हैदराबादविरुद्ध ३१ धावा केल्या. गोलंदाजीत या संघाचे बिली स्टॉनलेक आणि यजुवेंद्र चहल हे ‘क्लिक’ झाले होते. मुंबई संघ दोन विजय आणि एका पराभवासह तिसºया स्थानावर आहे. काल रात्री पुण्याचा त्यांनी चार गड्यांनी पराभव केला. नीतीश राणा याने तिन्ही सामन्यात ३४, ५० आणि ४५असे योगदान दिले तर पार्थिव पटेल व जोस बटलर यांनी चांगली सुरुवात करून दिली होती. हार्दिक पंड्या याने पहिल्या दोन सामन्यात दमदार कामगिरी केली तर केकेआरविरुद्ध त्याचा भाऊ कुणाल पंड्या चमकला. किरोन पोलार्डचा खराब फॉर्म लक्षात घेत या सामन्यात असेला गुणरत्ने याला संधी मिळू शकते.