नवी दिल्ली : भारताचे महान अष्टपैलू कपिल देव यांनी भारताचा कर्णधार विराट कोहलीची तुलना सचिन व रिचर्ड्स या दिग्गजांसोबत केली आहे. कोहली म्हणजे सचिन व रिचर्ड्स यांचे मिश्रण असल्याचे कपिल देव यांनी म्हटले आहे. विराट अधिक खेळण्यामुळे आणि जास्तीत जास्त वर्कआऊट करण्यामुळे लवकर म्हातारा झाला, तर अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. शारीरिकदृष्ट्या अधिक फिट असल्यामुळे कोहलीचे शरीर आगामी कालावधीत कमकुवत होऊ शकते म्हणजेच अकाली म्हातारपण येऊ शकते, अशी कपिल यांना भीती सतावत आहे. भारताला १९८३ मध्ये विश्वविजेतेपदाचा मान मिळवून देणारे कर्णधार कपिल देव पुढे म्हणाले, ‘कोहली ज्यावेळी फलंदाजी करतो त्यावेळी तो चौकार ठोकून ‘जा चेंडू घेऊन ये’ अशा आविर्भावात गोलंदाजाकडे बघतो. तो मुंबई स्कूलचा फलंदाज नाही. तेथे गोलंदाजाला चौकार ठोकल्यानंतर त्याच्याकडे न बघण्याचे शिकवले जाते. त्यामुळे गोलंदाजाला राग येईल आणि तो तुमची विकेट घेऊ शकतो.’कपिल यांनी पुढे सांगितले की, ‘कोहली सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्याचे तंत्र उत्तम आहे. कधी कधी त्याचे फटके बघितल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्याशिवाय दुसरे काहीच करता येत नाही.’कोहलीबाबत भीती व्यक्त करता कपिल देव म्हणाले, ‘ज्यावेळी तुम्ही कसून मेहनत घेता त्यावेळी तुमचे स्नायू लवकर थकण्याची शक्यता असते. अधिक वर्कआऊट केल्यामुळे खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची भीती असते. त्यामुळे विराटाने आपली सर्व शक्ती एकाच वेळी खर्ची घातली तर, अशी भीती मला वाटत असते.’(वृत्तसंस्था)
कोहली म्हणजे सचिन व रिचर्ड्सचे मिश्रण : कपिल
By admin | Published: February 17, 2017 12:30 AM