आयसीसी रँकिंग : अजिंक्य रहाणेची झेप नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) ताज्या क्रमवारीत १५ व्या स्थानावर झेप घेतली आहे़ तो आता देशातील नंबर वन फलंदाज बनला आहे़ स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे याने ताज्या क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे़कोहलीने तिसऱ्या कसोटीत १६९ आणि ५४ धावांची खेळी केली होती़ याच कामगिरीच्या बळावर त्याने ताज्या क्रमवारीत ४ क्रमांकाच्या उडीसह १५ व्या स्थानावर ताबा मिळविला आहे़ टॉप १५ फलंदाजात तो एकमेव भारतीय खेळाडू आहे़ यापूर्वी १७ व्या क्रमांकावर विराजमान असलेला चेतेश्वर पुजारा आता १९ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे़ स्टार खेळाडू अजिंक्य रहाणे याने १५ क्रमांकाची उडी घेतली आहे़ तो आता संयुक्तरीत्या ४१ वरून २६ व्या क्रमांकावर पोहोचला आहे़ भारताचा सलामीवीर फलंदाज मुरली विजय २० व्या क्रमांकावर कायम आहे, तर कसोटीतून निवृत्तीची घोषणा करणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याने ३६ व्या क्रमांकावरून आपल्या कारकीर्दीचा अखेर केला़ त्याला ताज्या क्रमवारीत एका स्थानाचे नुकसान झाले़आणखी एक सलामीवीर फलंदाज शिखर धवन याची ६ क्रमांकाने घसरण झाली आहे़ तो आता ६३ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे़ आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्हन स्मिथ पहिल्यांदाच ५ व्या क्रमांकावर पोहोचला आहे़ त्याला २ क्रमांकाचा लाभ झाला आहे़भारताचा आऱ आश्विन १४ वरून १५ वर, तर ईशांत शर्मा २० व्या क्रमांकावर कायम आहे़ उमेश यादव ८ क्रमांकाच्या उडीसह ३६ व्या स्थानावर पोहोचला आहे़ मोहंमद शमीला ८ क्रमांकाचा लाभ झाला आहे़ तो ३८ व्या क्रमांकावर पोहोचला आहे़ (वृत्तसंस्था)
कोहली देशातील नंबर वन फलंदाज
By admin | Published: December 31, 2014 11:47 PM