नागपूर : टीम इंडियाने तब्बल २२ वर्षांनतर श्रीलंकेत २-१ ने कसोटी मालिका जिंकली. या ऐेतिहासिक जेतेपदात कर्णधार या नात्याने विराट कोहलीच्या नेतृत्वगुणाचा चांगलाच कस लागला; पण त्याने स्वत:ची प्रतिभा सिद्ध केल्याचे मत श्रीलंकेचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि सलामीवीर सनथ जयसूर्या याने शनिवारी नागपुरात व्यक्त केले. वन डे क्रिकेटमध्ये पहिल्या चेंडूपासून गोलंदाजीच्या चिंधड्या उडविण्याचा नवा पायंडा खरे तर जयसूर्याने पाडला. भारताविरुद्ध या खेळाडूने अनेकदा मनसोक्त खेळून धावांचा पाऊस पाडला होता. एका वैद्यकीय परिषदेसाठी आलेला जयसूर्या ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला, ‘‘विराटने संघाचे यशस्वी नेतृत्व करून भारताला २२ वर्षांनंतर मालिका विजय मिळवून दिला. त्याने स्वत:च्या कौशल्याने संघाचे जे नेतृत्व केले, त्याची सर्वांनी प्रशंसा करायला हवी. पाच गोलंदाज खेळविणे हा धाडसी निर्णय होता; पण त्याने अपेक्षित निकाल देऊन ५ गोलंदाज खेळविणे कसे लाभदायी असते, हेदेखील सिद्ध केले. विराट हा जोखीम पत्करणारा आणि जीव ओतून खेळणारा खेळाडू आहे. स्वत:कडे असलेल्या क्लृप्त्यांचा वापर करायलादेखील तो मागेपुढे पाहत नाही.’’लंकेकडून १४ कसोटी आणि २८ वन डे शतके ठोकणाऱ्या जयसूर्याने गेल्या ३ एप्रिलला लंकेच्या मुख्य निवडकर्ता पदाचा राजीनामा दिला होता. अटापट्टूच्या राजीनाम्यानंतर लंकेचे कोचपद स्वीकारण्याची काही ‘आॅफर’ आहे काय, असे विचारताच लंका क्रिकेटबद्दल काहीसा नाराजीचा सूर त्याच्या बोलण्यातून जाणवत होता. नुकत्याच झालेल्या मालिकेत भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचे त्याने कौतुक केले. फिरकीपटूंबद्दल तो म्हणाला, ‘‘आश्विन आणि अमित मिश्रा यांनी स्वत:च्या कुवतीपेक्षा किती तरी चांगली गोलंदाजी केली.’’ सनथने भारताच्या वेगवान गोलंदाजांचीदेखील पाठ थोपटली. भारत-लंका मालिकेदरम्यान ‘आक्रमकता’ आणि खेळाडूंमधील ‘शाब्दिक चकमक’ चांगलीच गाजली. याविषयी जयसूर्याचे मत जाणून घेतले असता सनथ म्हणाला, ‘‘मैदानावर असे प्रकार घडत असतात; पण सामना संपल्यानंतर त्याची प्रतिक्रिया बाहेर उमटायला नको. खेळाडूंनी आयसीसी आचारसंहितेचे भान राखूनच वर्तन करावे. या मालिकेत जो प्रकार घडला त्याबद्दल मॅच रेफ्रीने ईशांत, दिनेश चांदीमल, धम्मिका प्रसाद, लाहिरू थिरिमाने यांना दिलेली शिक्षा योग्यच आहे.’’ आमच्या वेळी भारताविरुद्ध वारंवार साामने खेळले जायचे; पण उभय देशांत कधीही असे प्रसंग ओढवले नाहीत. आमच्या वेळी आम्ही सभ्यपणे क्रिकेट खेळलो, असे सनथने नमूद केले. (क्रीडा प्रतिनिधी)
कोहलीने स्वत:ला सिद्ध केले : जयसूर्या
By admin | Published: September 13, 2015 4:07 AM