नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी कोहलीला जोखीम न पत्करण्याचा सल्ला दिला आहे. जर गरज भासली तरच त्याने आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजी करावी, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.गावस्कर म्हणाले, ‘रांचीची खेळपट्टी अद्याप फलंदाजीसाठी अनुकूल आहे. भारतीय संघाने कोहलीच्या योगदानाशिवाय आॅस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४५१ धावसंख्येपर्यंत मजल मारायला हवी. कोहलीची दुखापत गंभीर नसली तरी त्याला मैदानापासून दूर राहणे आवडत नाही. तो मैदानावर आला नाही याचा अर्थ दुखापत थोडी मोठी आहे. त्यामुळे त्याला फिट होण्यासाठी पूर्ण विश्रांती मिळायला हवी. ’गावस्कर पुढे म्हणाले, ‘भारताची घसरगुंडी उडाली आणि धावफलकावर जास्ती धावा नाही, अशी परिस्थिती ओढवली तरच कोहलीने फलंदाजीसाठी मैदानात यायला हवे, अन्यथा त्याने विश्रांती घ्यायला हवी.कोहली फिट भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात उर्वरित दिवस कर्णधार विराट कोहलीच्या खेळण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला. कोहली खेळण्यासाठी फिट असल्याचे उमेश यादवने आज पत्रकार परिषदेत सांगितले. यादव म्हणाला,‘दुखापतीनंतर पट्टी तर असतेच, पण माझ्या मते, विराट खेळण्यासाठी फिट आहे. नेटवर त्याने केलेल्या सरावानंतर तो पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे दिसून येते.’
‘गरज भासली तरच कोहलीने फलंदाजी करावी’
By admin | Published: March 18, 2017 5:07 AM