नवी दिल्ली : राजकुमार शर्मा यांच्या मते प्रशिक्षक हा आई-वडिलांपेक्षा वेगळ नसतो. त्यामुळे ते विराट कोहलीबाबत अधिक भावुक आहेत. प्रतिष्ठेच्या द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड झालेले राजकुमार विराट १० वर्षांचा असतानापासून त्याचे प्रशिक्षक आहेत. विराट आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार आहे. ५१ वर्षीय राजकुमार म्हणाले, ‘ही सन्मानाची बाब आहे. आता एक नाही तर अनेक विराट तयार करण्याची जबाबदारी वाढली आहे. मला आजही तो दिवस आठवतो ज्यावेळी १० वर्षांचा विराट माझ्या शिबिरात दाखल झाला होता. आज भारतीय संघाचा कर्णधार म्हणून ज्यावेळी तो नेट््समध्ये सरावासाठी येतो त्यावेळीही मला फरक जाणवत नाही. तो आत्ताही माझ्यासाठी तोच छोटा विराट आहे.’ यापूर्वीही या राजकुमार यांची अनेकदा द्रोणाचार्य पुरस्कार समितीकडे शिफारस झाली होती, पण यंदा त्यांची निवड झाली. ‘ज्यावेळी विराटला अर्जुन पुरस्कार मिळाला होता, त्यावेळी मी राष्ट्रपती भवनमध्ये होता. तेव्हा त्याने म्हटले होते की, पुढील वर्षी ज्यावेळी तुम्हाला द्रोणाचार्य पुरस्कार मिळेल त्यावेळी मी प्रेक्षकांमध्ये बसून टाळ्या वाजवेल. विराट जर दौऱ्यावर नसता तर तो २९ आॅगस्ट रोजी नक्की राष्ट्रपती भवनमध्ये असता,’ असेही राजकुमार यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
आताही तसाच आहे कोहली - राजकुमार
By admin | Published: August 24, 2016 4:10 AM