नवी दिल्ली : आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केले आहे. जॉन्सन म्हणाला,‘विराट कोहली नैराश्याचा बळी ठरला आहे. विराट कोहली बेंगळुरू कसोटीमध्ये आपल्या जुन्या रणनीतीचा वापर करीत होता. तो उत्साही आहे, पण सध्या त्याच्या धावा होत नसल्यामुळे निराश झाला आहे. तो चांगली कामगिरी करण्यासाठी आपल्या भावना व्यक्त करीत आहे.’जॉन्सन पुढे म्हणाला,‘कसोटी सामन्यात ज्यावेळी कुणी बाद होत होते त्यावेळी कॅमेरा ताबडतोब विराट कोहलीवर केंद्रित होत होता. कारण कॅमेरामनला प्रतिक्रिया मिळणार असल्याची कल्पना होती. विराटने आॅस्ट्रेलियाविरुद्ध गेल्या दोन कसोटी सामन्यात चार डावांमध्ये अनुक्रमे ०, १३, १२ व १५ धावा केल्या आहेत.’आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणारा जॉन्सन म्हणाला,‘बेंगळुरू कसोटीतील संघर्षपूर्ण खेळाचा मी पूर्ण आनंद घेतला. विराट या लढतीत उत्साहामध्ये दिसला. तो प्रेक्षकांना समर्थन देण्यास सांगत होता.’जॉन्सन पुढे म्हणाला,‘ माझ्या मते, डिसेंबर २०१४ ते जानेवारी २०१५ पर्यंतच्या भारतीय संघाच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण ताजी झाली. त्यावेळी चारही कसोटी सामन्यांत पाहुण्या संघाने चमकदार खेळ केला होता. भारतीय संघाला त्या मालिकेत ०-२ ने पराभव स्वीकारावा लागला होता. या मालिकेत कोहलीने ८६.५ च्या सरासरीने ६९२ धावा केल्या होत्या. त्यात चार शतकी व एका अर्धशतकी खेळीचा समावेश होता. (वृत्तसंस्था) हेडनने खेळपट्टीबाबत उपस्थित केला प्रश्नआॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने भारत व आॅस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जात असलेल्या सध्याच्या मालिकेतील खेळपट्ट्यांबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. हेडन म्हणाला, ‘आतापर्यंत मालिका चांगली होत आहे, पण लढती दुय्यम दर्जाच्या खेळपट्ट्यांवर खेळल्या जात आहेत. उभय संघांदरम्यान चुरस अनुभवाला मिळत आहे. विशेषत: दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली चुरस अनुभवाला मिळाली. आॅस्ट्रेलियाच्या मॅट रेनशॉने फलंदाजीसाठी खडतर असलेल्या खेळपट्ट्यांवर चांगली फलंदाजी केली. केवळ २० वर्षांच्या असलेल्या खेळाडूने परिपक्वता सिद्ध केली. आॅस्ट्रेलियाने या मालिकेत दाखविलेली लढवय्यावृत्ती श्रीलंका दौऱ्यात दिसली नाही.’ (वृत्तसंस्था)
कोहली नैराश्याचा बळी : जॉन्सन
By admin | Published: March 13, 2017 3:34 AM