आॅनलाइन लोकमत/आकाश नेवेनवी दिल्ली- आयपीएल १०च्या सत्रातला अखेरचा साखळी सामना थोड्याच वेळात दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू होणार आहे. दिल्ली डेअर डेविल्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरू या संघातील अखेरच्या सामन्यात तरी आरसीबीचा कर्णधार कोहली आपले विराट रुप दाखवणार का, दिल्ली डेअर डेविल्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ प्ले आॅफच्या बाहेर पडले आहेत. आरसीबी तर ५ गुण घेऊन तळाच्या स्थानावर आहे. कुणी स्वप्नातही विचार केला नसेल अशी अवस्था या दिग्गज संघाची या स्पर्धेत झाली आहे. कोहली, डिव्हिलियर्स, गेल, केदार जाधव, शेन वॉटसन या सारख्या महारथींचा संघ केकेआरविरोधात निचांकी ४९ धावांवर बाद झाला होता. या स्पर्धेत आरसीबीच्या फलंदाजांना क्वचितच सूर गवसला आहे. या स्पर्धेतला अखेरचा साखळी सामना दिल्लीच्या होमग्राउंडवर होत असल्याने दिल्लीकरांना नक्कीच सामन्याची उत्सुकता असेल. विराट कोहली हा मुळचा दिल्लीचा असल्याने त्याच्या चाहत्यांची संख्या ही दिल्ली डेअरडेविल्सच्या चाहत्यांपेक्षा यासामन्यात जास्त असेल. तो फलंदाजीसाठी येईल तेव्हा त्याची या सत्रातील कामगिरी विसरुन दिल्लीकर चाहते पुन्हा विराट विराटच्या घोषणा देऊन त्याला प्रोत्साहन देतील. मात्र डेअरडेविल्सच्या गोलंदाजांवर तुटून पडायचे की अनुभवी जहीर, शमीसमोर लोटांगण घालत चाहत्यांना निराश करायचे हे विराट सेनेच्या हाती आहे. गेल्या सत्रात चार शतके झळकावणाऱ्या विराटला या स्पर्धेत फक्त दोनच वेळा पन्नाशी गाठता आली आहे. गेल, डिव्हिलियर्स तर सपशेल अपयशी ठरले आहे.त्या तुलनेने दिल्लीचे फलंदाज अनुभवी नसले, तरी त्यांच्या गुणवत्ता ठासून भरली आहे. त्यांनी २०० पेक्षा जास्त धावांचांही यशस्वी पाठलाग केला आहे. आरसीबीच्या गोलंदाजांना सॅमसन, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, करुण नायर यांच्या विरोधात विशेष योजना बनवावी लागेल. या पैकी एकही फलंदाज खेळपट्टीवर स्थिरावला तर तो आरसीबीसाठी महाग ठरेल. आरसीबीने १२ कोटी रुपये देऊन घेतलेल्या टायमल मिल्स याला या स्पर्धेत आपला जलवा दाखवता आलेला नाही. त्याऐवजी अनिकेत चौधरी याने प्रभावी मारा करत प्रतिस्पर्ध्यांना अडचणीत आणले आहे. या सामन्यात चाहत्यांचे लक्ष फक्त विराट कोहलीकडेच असेल. त्याला मैदानावर अतिआक्रमकता दाखवण्याएवजी फलंदाजीत आक्रमकता दाखवावी लागेल.
अखेरचा सामन्यात तरी दिसणार का कोहलीचे विराट रूप
By admin | Published: May 14, 2017 6:04 PM