पुणे : महाकबड्डी लीगच्या दुसऱ्या सत्रात कोल्हापूर हरिकेन्स संघाने पुणे पॅन्थर्सवर शनिवारी ३४-२६ने मात करीत महिला गटामधून बाद फेरीत प्रवेश केला. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॉक्सिंग हॉलमध्ये ही स्पर्धा सुरू आहे. मध्यंतरापूर्वी कोल्हापूर संघ अत्यंत सावध खेळ करीत बचावाचे धोरण स्विकारले होते. मात्र पुण्याच्या शिवनेरी चिंचवले व ऐश्वर्या शिंदे यांनी आक्रमक पावित्रा घेतला. या दोघींसह अदिती जाधवने एक-एक खेळाडू टिपत आघाडी वाढवत नेली. कोल्हापूर संघानेही याला प्रत्युत्तर देत मोनिका शिंदे व स्नेहल शिंदे हे आपले हुक्के चढाईला पाठवले. मात्र त्यांना मध्यंतरापूर्वी सुर गवसला नाही. परिणामत: कोल्हापूर संघ मध्यंतराला ११-१४ने माघारला होता.मध्यंतरानंतर लगेचच स्नेहल शिंदेने अव्वल चढाई करीत कोल्हापूरला १५-१४ अशी आघाडी मिळवून दिली. हाच सामन्याचा टर्निंग पॉर्इंट ठरला. त्यानंतर पल्लवी जाधवने पकड घेत १९-१५ अशी आघाडी वाढविली. पुनम तांबे व पल्लवी जाधव यांनीही चांगल्या पकडी घेतल्या. त्यानंतर मोनिका शिंदे व स्नेहल शिंदे यांनी सामन्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेत सातत्याने आक्रमक खेळ केला. सामना संपण्यास १० मिनिटे बाकी असताना कोल्हापूरकडे २२-१७ ने आघाडी होती. सामन्याचा शेवट ७ मिनिटांवर आला असताना पुण्याच्या ऐश्वर्या शिंदेने २ गडी बाद करीत पिछाडी २१-२२ने कमी करून सामन्यात रंगत आणली. मात्र मोनिका शिंदेने तृप्ती सोनवणेची पकड घेत कोल्हापूरला २६-२२ ने आघाडीवर नेले. सामना संपण्यास १ मिनिट असताना कोल्हापूरकडे ३१-२५ने आघाडी होती. अखेरच्या मिनिटाला ३ गुण घेत कोल्हापूरने बाद फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. कोल्हापूरला नमवून पुण्याच्या पुरुषांचे आव्हान कायमपुरूष विभागात पुणे पॅन्थर्स संघाने कोल्हापूर हरिकेन्स संघावर ३५-२९ असा विजय मिळवित स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. पुणे संघाने सुरवातीपासून नियोजनबद्ध आणि सावध खेळ केला. यामध्ये अक्षय जाधव व सचिन पाटील यांच्या चढाया तर सुनिल लांडे व गणेश ढेरंगे यांनी घेतलेल्या पकडी मुळे हा विजय सोपा झाला. मध्यंतराला पुणे संघाकडे १९-१३ने आघाडी होती.
कोल्हापूर लय भारी!
By admin | Published: September 25, 2016 5:17 AM