कोल्हापूर : जागतिक मानांकनात अव्वल असलेल्या कोल्हापुरच्या शांभवी क्षीरसागर आणि राजकुंवर इंगळे या दोन नेमबाजांची कनिष्ठ विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाकडून दक्षिण अमेरिकेतील पेरु येथील लिमा येथे येथे ३ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. आंतरराष्ट्रीय शूटींग स्पाेर्ट फेडरेशनच्या कनिष्ठ विश्वचषक अजिंक्यपद स्पर्धेत निवड झालेल्या या दोन नेमबाजांनी कोल्हापूरचे नाव उंचावले आहे.
कोल्हापूरची शांभवी क्षीरसागर एअर रायफल कनिष्ठ संमिश्र पथकामध्ये सहभागी होणार आहे. शांभवीने इंदौर येथील खुल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पीपसाईट १० मीटर रायफल प्रकारात पात्रता फेरीत ६३२.४ गुण मिळवले. भोपाळ येथील कुमार सुरेंद्रसिंह नेमबाजी पात्रता स्पर्धेत तिने पहिल्या आठमध्ये स्थान मिळविले होते. याशिवाय स्पेनमधील आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत तिने वैयक्तिक कांस्यपदक पटकावले होते. सब युथ, युथ ज्युनियर, ज्युनियर, सीनियर अशा चार प्रकारात तिने यापूर्वी सुवर्णपदक मिळविले आहे. तिला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संतोष जाधव आणि वडील श्रावण क्षीरसागर यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूरची राजकुंवर इंगळे हिची निवड महाराष्ट्र राज्य शॉटगन ट्रॅपशूटिंग स्पर्धेतील विशेष कामगिरीच्या निकषावर करण्यात आली आहे. राजकुंवरने इटली येथील जुलै २०२४च्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत निवड झाली होती. यापूर्वी तिने राष्ट्रीय स्पर्धेत दोन रौप्य, एक कास्य तसेच खेलो इंडियामध्ये कास्यपदक मिळविले आहे. या स्पर्धेत ज्युनियर वुमन्स या गटाअंतर्गत ५ ऑक्टोबर रोजी ट्रॅप प्रकारात खेळणार आहे. राजकुंवरला आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक रियान रिझवी दिल्लीत प्रशिक्षण देत आहेत. तिला खासदार शाहू छत्रपती, संभाजीराजे, मालोजीराजे, मधुरिमाराजे, प्रनील आणि पृथ्वीराज इंगळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.