ऑनलाइन लोकमत -
कोलकाता, दि. १२ - टी20 वर्ल्ड कपमधील भारत-पाकिस्तान मॅच कोलकात्यात घेण्यावरुन दहशतवाद विरोधी आघाडीने (Anti-Terrorist Front of India) विरोध दर्शवला आहे. 19 मार्चला भारत - पाकिस्तान सामना खेळवला गेल्यास आम्ही ईडन गार्डनमधील मैदान उखडून टाकू, अशी धमकीच त्यांनी दिली आहे. दहशतवाद विरोधी आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विरेश शांडिल्या यांनी याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पत्रदेखील लिहिलं आहे.
दहशतवादी हल्ल्यांमध्ये शहीद झालेल्यांचा हा अपमान असल्याने हा सामना खेळवला जाऊ नये अशी मागणी विरेश शांडिल्या यांनी केली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचं स्वागत करणं हे दहशतवाही हल्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा अपमान आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पाकिस्तान संघाला सुरक्षा तसंच इतर कोणत्याच सुविधा पुरविण्यात येऊ नये अशी विनंती केली आहे अशी माहिती विरेश शांडिल्या यांनी दिली आहे.
मुंबई, पठाणकोट आणि पम्पोरे दहशतवादी हल्याचा कट रचणा-यांना भारताच्या हवाली केल्यास आमची सामना खेळवण्यास काही हरकत नसल्याचं विरेश शांडिल्या यांनी सांगितलं आहे. 14 मार्चपासून दहशतवाद विरोधी आघाडीचे कार्यकर्ते संपुर्ण राज्यभर आंदोलन करणार आहेत. ज्यामध्ये ईडन गार्डन, हॉटेल आणि एअरपोर्टचा समावेश असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाने यामध्ये मध्यस्थी करुन पाकिस्तान संघाला भारतात येण्यापासून रोखावे अशी मागणीही विरेश शांडिल्या यांनी केली आहे.
सुरक्षेच्या मुद्यामुळे भारत-पाकिस्तान सामना हिमाचल प्रदेशमधील धरमशाला येथे न घेता कोलकात्यामधील ईडन गार्डनवर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता मात्र कोलकात्यातदेखील या सामन्याला विरोध होऊ लागला आहे.