माद्रिद : भारताच्या 17 वर्षीय कोमालिका बारीनं जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानच्या वाका सोनोडाला नमवून कॅडेट महिला गटाचे सुवर्णपदक नावावर केले. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती तिसरी भारतीय तिरंदाज ठरली आहे. ''जागतिक जेतेपद जिंकल्याचा आनंद आहे. हे यश माझ्या प्रशिक्षकांमुळे शक्य झाले आहे,'' अशी प्रतिक्रिया कोमालिकाने दिली.
झारखंडची कोमालिका ही जागतिक स्पर्धेत 18 वर्षांखालील महिला गटाचे जेतेपद पटकावणारी दुसरी भारतीय आहे. याआधी 2009मध्ये दिपिका कुमारीने याच गटात बाजी मारली होती आणि त्यानंतर तिने 2011मध्ये कनिष्ठ ( 21 वर्षांखालील) गटाचे जेतेपद नावावर केले होते. 2006मध्ये पल्टन हँस्डाने 2006च्या जागतिक स्पर्धेत कनिष्ठ पुरुष गटातील कम्पाऊंड प्रकारात बाजी मारली होती.